Wednesday, August 29, 2012

मदर इंडिया ते नेदरलँड

२०, २१ ऑगस्ट २०१२ :

११  जुलै ला विसा मिळाला आणि मी AMSTERDAM ला MS  करायला जाणार हे निश्चित झाले. झाले! तयारी राहिली बाजूला, भेटीगाठी , गेट टूगेदर यांना ऊत आला.  शेवटच्या क्षणापर्यंत सामानाचे वजन करून सुटकेस भरणे चालू होते. २० तारखेच्या सोमवारी रात्री अकरा वाजता फ्लाईट होती. गाडीत बरोबर प्रणव (सख्खा भाऊ) , आई, दोन काकू, आत्या अशी मंडळी  होती. घरातून निघताना दादांचे (आजोबा) पाणावलेले डोळे बघवत नव्हते. आबा काका, वैभव, शेखर काका , आणि पंकज व सागर (BEST FRIENDS ), नंदादीप सोसायटी , सिंहगड रोड , पुणे आणि पुण्याचे पाणी , पुण्याची माती  यांना निरोप देणे तितकेच अवघड होते. चेहरा शक्य तितका  निर्विकार ठेवून घरातून बाहेर पडलो.  भर दुपारी एक वाजता सुद्धा ढगाळ वातावरण होते. आम्ही जात असलेली तवेरा गाडी उगाच भरभर जात आहे असा भास होत होता. ५ वाजता आम्ही विमानतळावर पोचलो सुद्धा ! प्रवासात काकू-आत्या आणि आई यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकणे आणि सतत येत असणाऱ्या फोन्सना प्रतिसाद देणे हाच उद्योग होता. प्रसाद (सख्खा चुलत भाऊ)  आणि मामा थेट मुंबई विमानतळावर निरोप द्यायला आलेहोते. ११ ची फ्लाईट असली तरी चेक-इन "शक्य तितके लवकर कर" या सल्ल्यामुळे साडेसहा वाजताच मी मुख्य दाराकडे निघालो. ट्रॉली वर दोन बॅग्स ठेवून वर केबिन बॅग आणि शिवाय जर्किन असे सामान बरोबर होते. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मागे वळून पाहण्याचे धाडस मी केले नाही. आईचा बांध नक्कीच  कोसळला असता. तिने कालपासून एकदा सुद्धा डोळ्यात पाणी येऊ न देऊन खूप मोठा मानसिक आधार दिला होता.  सुदैवाने CRYING CEREMONY घडला नाही. ७ वाजता चेक इन सुरु होणार आहे असे कळले; मुंबई विमानतळावर सगळा मराठी स्टाफ आहे असे कोणीतरी सांगितल्याचे आठवले. मी मराठीतूनच चौकशी करून माझी ओळ कुठली व माझी सामानाची तपासणी कोण करणार आहे इत्यादी माहिती करून घेतली.
इस्राईल एयरलाईनची तपासणी म्हणजे एक भयानक अनुभव होता: त्या माणसाने मला अतिरेकी समजून प्रश्न विचारायला सुरवात केली. "TELL ME ABOUT YOURSELF " या प्रश्नाने तर मी उडालोच. (हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो ). नंतर मी त्याला माझा संपूर्ण बायो-डाटा सांगितला तेव्हा कुठे तो शांत झाला. दोन्ही  बॅग्सची कसून तपासणी झाल्यावर मी त्या बॅग्स प्लास्टिकने गुंडाळण्यासाठी गेलो. ते मशीन (ज्याला मी श्री-कृष्ण मशीन नाव दिले ) पाहून द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा  राहिला. दुर्योधन द्रौपदीचे वस्त्र-हरण करत असताना कृष्ण ज्याप्रमाणे हातातून वस्त्र देऊन द्रौपदी चे लज्जा-रक्षण करत असतो ,तद्वत त्या मशीन मधून प्लास्टिक बाहेर येत होते व बॅगला गुंडाळले जात होते.  चेक इन झाल्यावर "आप्रवासन" (IMMIGRATION) कडे निघालो. त्याचा FORM भरून सुरक्षा तपासणी साठी रांगेत उभा राहिलो. ब्लेझर वगळता काही कपडे काढावे लागले नाहीत हे नशीबच! या सगळ्या दिव्यातून  पार पडल्यानंतर DUTY FREE शॉप्स च्या मोठ्ठ्या मॉल सारख्या भासणाऱ्या जागेत आलो. येथून सर्व सुटणाऱ्या  विमानांचे प्रवेश असतात. आणि जोपर्यंत BOARD करायला सांगत नाहीत तोपर्यंत तुम्हाला BORE व्हावे लागते. त्यातून मी एकटा होतो. विद्यार्थी भासणाऱ्या दोघांना मी हेरले: प्रतिक आणि देवेश(पुणेकर)!  मीहून बोलायला सुरवात केली. मग मैत्री व्हायला वेळ लागला नाही. एकत्र जेवण, फिरणे , फोटो काढणे यांत वेळ घालवला. ते दोघे आणि इतर अजून ७ जण न्यूयॉर्क ला BRINGHAMTON ला MS करायला चालले होते. तेल-अवीव पर्यंत माझ्या-बरोबर असणार होते हा एक मोठाच दिलासा होता. ११ वाजता बोर्डिंग सुरु झाले. आणि आमच्या नकळत आम्ही विमानात प्रवेश केला. माझा पहिलाच विमान-प्रवास असल्याने थोडी धाकधूक होती. टेक ऑफ ला काहीतरी होईल असे उगाच वाटत होते; पण साधा पोटात गोळा सुद्धा आला नाही. थ्रिलिंग वगैरे काहीच वाटले नाही. त्यातून बाहेर अंधार असल्याने काही बघायची सोय नव्हती. आतमध्ये मात्र हवाई-सुंदरी या नावाला जागतील आणि (खरंच रात्रभर पाणी- लोणी विचारण्यासाठी जागतील ) अशा होस्टेस होत्या :)  खिडकी जवळची जागा असल्याने निदान डोके टेकून झोपायचा प्रयत्न केला; मात्र पाय ताणून न देता आल्याने झोप आली नाही. वेळ घालवण्यासाठी जे येईल ते खात-पीत होतो. (फक्त शाकाहारी असल्याची खात्री करून ) इतका निवांत वेळ खूप दिवसांनी मिळाला होता. एक कविता झाली :" सोडून जाताना देश माझा.." शेजारी मुंबईचाच  RELIANCE मधला एक अनुभवी माणूस बसला होता. तो इस्राईल ला कामानिमित्त चालला होता. त्याने गप्पा मारून वेळ घालवण्यास थोडी मदत केली. माझ्या घड्याळात सहा वाजून गेले होते. AMSTERDAM ची फ्लाईट स६:१५ ची असल्याने मला काळजी वाटू लागली. पण शेजाऱ्याने ६:१५ हे तेल अवीव च्या वेळेनुसार असल्याचे सांगितले आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तिकीटा वरची वेळ ही त्या त्या देशानुसार असू शकते हे माझ्या लक्षात आले नव्हते.

पाचच्या  (इस्राईल च्या वेळेनुसार) सुमारास तेल अवीव ला पोचलो. ते विमानतळ कल्पनेहून अधिक सुंदर होते पण सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी वेळ नव्हता. माझी पुढील फ्लाईट ६:१५ ला होती. त्यासाठी TRANSIT VISA चे गेट शोधून माझ्या टर्मिनल पाशी जाऊन थांबलो. विमानतळावरील WI - FI  चा उपयोग करून मेसेज पाठवले. पावणे सहा वाजता बोर्डिंग झाले. पहाटेची वेळ, त्यातून आजूबाजूला असलेले विकसित केलेले नैसर्गिक (!) सौंदर्य. आंघोळ न करता सुद्धा ताजेतवाने वाटले. या विमान प्रवासात बरोबर कोणीही विद्यार्थी नव्हता. समोर चालू असलेला पिक्चर (हिमगौरी आणि सात बुटके या गोष्टीचा) बघण्यात वेळ घालवला. खिडकीची जागा असल्याने युरोपचे विहंगम (शब्दशः)  घडत होते. भूगोल कच्चा असल्याने देश व बेटे ओळखता येत नव्हती. पण जे काही होते ते नितांत सुंदर होते. ११ वाजता (नेदरलँड च्या वेळेप्रमाणे) AMSTERDAM ला पोचलो. मी करण्याआधी प्रणव चाच फोन आला. त्याला खुशाली कळवली. ARRIVALS पाशी जाऊन माझे सामान ताब्यात घेतले. WI - FI चा वापर करून FACEBOOK आणि GMAIL वर स्टेटस UPDATE  केले. UNIVERSITY ची बस घ्यायला येणार असल्याने त्यांना भारतातला IDEA चा नंबर दिला होता. स्किपहोल विमानतळा-बाहेर पडून कुठे बस दिसते का याचा शोध घेतला. LYCA मोबाईल चे कार्ड घेऊन UNIVERSITY ला फोन केला. त्यांनी ESN (ERASMUS STUDENT NETWORK ) च्या लोकांना शोधा असे सांगितले. एका भल्या डच माणसाने मला विमानतळावरील MEETING POINT दाखवला. सुदैवाने  तेथे ESN चे लोक सापडले. एका डच मुलीने स्वागत केले आणि नाव वगैरे विचारून मला थांबायला सांगितले. १२ ची बस चुकली होती. २ च्या बसला अवकाश होता. मी बिस्किटे खाऊन भूक भागवली. घरी फोन केला. माझ्या पाठोपाठ मारिया, जुलिया, अनाडा, जॉर्जिया , वगैरे परदेशी मुली VRIJE ला जाण्यासाठी MEETING POINT ला आल्या. (वेळ चांगला गेला हे सांगायला नकोच.) "आऊलेन्स्ताद" (UILENSTEDE) हे आमचे राहण्याचे ठिकाण ! तेथे बसने जाण्यास १५ मिनिटे लागली. पोचताच अनेक कागदी घोडे नाचवणे जरुरी होते: तिथल्या नगरपालिकेत नाव-नोंदणी, बँक खाते उघडणे, DUWO (घरे भाडे-तत्वावर देणारी संस्था) यांचे CONTRACT SIGN करणे  , RESIDENCE PERMIT  घेणे, ESN चे कार्ड घेणे.... हे सगळे करेपर्यंत ६ वाजून गेले आणि दमून गेलो. जुलिया आणि जॉर्जिया बरोबर असल्याने (निदान कोणीतरी बरोबर असल्याने) थोडा उत्साह शिल्लक होता. रूम्स च्या चाव्या घेऊन रूम गाठली. ७ वा मजला ! एंथनी नावाच्या मुलाने मला लिफ्ट पर्यंत सामान नेण्यास मदत केली.  हुश्श झाले.  सामान लावेपर्यंत ९ वाजले. तरी बाहेर ऊन होते पण आता जेवायला हवेच होते. आईने दिलेले पराठे गरम करून खाल्ले. माझ्या शेजारीच निशांत नावाचा भारतीय भेटला; त्याच्या रूम मध्ये सौरभ नावाचा जळगाव चा मुलगा थोडे दिवस राहायला आला होता. त्यांना भेटून बरे वाटले. शांत झोप लागली.