Monday, June 24, 2013

"कोकेन" (केउकेन) हॉफ : नशा फुलांचा

४  मे  २ ० १ ३

केउकेनहॉफ ! (Keukenhof ) इंग्रजी मध्ये याचा अर्थ किचन गार्डन असा होतो. "केउकेनहॉफ" जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग मानली  जाते. ३२ हेक्टरचा विस्तार असणाऱ्या  या  बागेत दरवर्षी ७ लक्ष हून अधिक फुले फुलवली जातात. केउकेनहॉफ विषयी असलेला मोठा गैरसमज  म्हणजे टुलिप गार्डन ! हे टुलिप गार्डन नसून, इथे फुलणाऱ्या अनेक फुलांपैकी एक प्रमुख आकर्षण म्हणून टुलिप प्रसिद्ध आहे . त्यामुळे फक्त टुलिप ची शेतं बघण्याची इच्छा असेल , तर बागेचे तिकीट न काढता , बागे बाहेरील टुलिप च्या शेतांमध्ये मनसोक्त वेळ घालवता येतो .
मात्र  बागेत फुलवलेली फुले आणि विकसित केलेले रमणीय भूप्रदेश ( landscapes ) हे बघण्यासारखे आहेत. हे बाग केवळ मार्च ते मे या कालावधीतच खुली असते. बागेत फुललेले टुलिप पहायचे असल्यास एप्रिल महिन्याच्या शेवटी येथे भेट द्यावी.
अनायासे अॅमस्टरडॅम मध्ये असल्याने एक दिवस या बागेत जाऊन यावे असे बरेच दिवस चालले होते. रोशन चा मित्र अभिनव साडू त्याला भेटायला जर्मनी हून आला आणि त्यांच्या सोबत कौस्तुभा , शरण व मी ही छोटीशी ट्रीप आखली.
स्कीफोल विमानतळावरून "लीसं"  (Lisse ) येथे वसलेल्या केउकेन हॉफला जाण्यासाठी खास बस सोडण्यात येतात. २३ युरो च्या तिकिटात बसचे जाण्या-येण्या साठीचे भाडे आणि बागेचे प्रवेश शुल्क यांचा समावेश असतो (तिकिटाचा दर २०१३ प्रमाणे ). स्कीफोल विमानतळावर केउकेन हॉफ ला जाणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र exit ची सोय होती. बस मध्ये बहुतेक पर्यटक भारतीय किंवा पौर्वात्य देशातील दिसत होते. त्यामुळे उगाच आपल्या माणसांत आल्या सारखे वाटत होते.  कानावर मराठी / हिंदी पडताच कान टवकारले जात होते. भाषा ही एक अजब गोष्ट आहे. ती अवगत नसेल तर तुम्ही कान असूनही बहिरे ठरता आणि तीवर प्रभुत्व असेल तर परक्या देशातही आपले ठरता. असल्याच काहीशा विचारांत बसने केउकेन हॉफ  पर्यंतचा पल्ला पार केला.

बागेचा परिसर  विस्तीर्ण असून तिची रचना विविध पद्धतींनी केली आहेत. २ ० १ ३ ची थीम "UK : Land  of great gardens " होती. लंडन चा Big Ben tower फुलांची रांगोळी फुलवून साकारला होता !

बागेचे विविध भागांत विविध देशांच्या खास शैली प्रमाणे फुलांचे ताटवे विकसित केले होते. इंग्लिश landscapes , जपानी country गार्डन , नेचर गार्डन अशा पद्धती पहावयास मिळतात. वसंत ऋतू इथे खऱ्या अर्थाने सर्व रंग आणि त्यांच्या शक्य तितक्या छटा यांची ओळख करून देतो (रंग दाखवतो असे म्हणणे योग्य होणार नाही )

 नेदरलँडच्या आता पर्यंत च्या सर्व राण्या आणि राजे यांच्या नावाने या बगिच्यामध्ये लहान - मोठ्या प्रदर्शनीय इमारती / तंबू ( Pavilion ) आहेत. प्रत्येक तंबू म्हणजे एक ग्रीन हाऊस आहे. प्रत्येक ग्रीन हाऊस मध्ये नेत्रसुखद अनुभवांची रेलचेल होती.

बागेत एक पवनचक्की पर्यटकांसाठी खुली आहे (मोफत !)  तीवरून बागेबाहेरील टुलिप ची शेते सुंदर टिपता येत होती (डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात सुद्धा )
वर्णन लिहिण्यास आता शब्द अपुरे पडायला लागले आहेत ! काव्यात्मकच काहीतरी लिहिणे क्रमप्राप्त आहे :
इन्द्रधनु जणू बनू पाहती टुलिप ची ही फुले । निळाई आकाशी खुले अन "धरती"पण धरती भुले ॥

हंसराज श्वेत हा पाण्यात ! रंगीत कुसुमांना पाहतो पाण्यात !






किरण सूर्याचा लपू पाहे ! अशी ही ट्युलिप्स ची रांग आहे !


जळी स्थळी सर्वकाळी । पर्णांच्या मखरातील तळी ॥
ज्योती पेटलेल्या असंख्य जणू या धरणी ।  रमलेले मानव रंगात, नाही कुणी हरणी ॥


फुले आवडो न आवडो ! फुलं  आवडणाऱ्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर एकदा तरी भेट द्यावी असे हे उद्यान आहे !


क्वीन्स डे ! (राज-दिन)



३० एप्रिल हा दिवस हॉलंड मध्ये क्वीन्स डे (राणीचा दिवस !)  म्हणून साजरा केला जातो . या दिवसाला नुसते ऐतिहासिक महत्व आहे असे नसून हा एक आंतरराष्ट्रीय उत्सव आहे . अनेक युरोपीयन  नागरिक या दिवशी हॉलंड मध्ये आवर्जून हजेरी लावतात. जर्मन आणि  बेल्जिअन प्रसार-माध्यमेसुद्धा  ज्याचे चवीने प्रसारण , अवलोकन करतात , अशा मोजक्या डच सणांपैकी एक म्हणजे क्वीन्स डे !
क्वीन्स डे चा इतिहास मोठा रंजक आहे. 
नेदरलँड चा राजा  (१८४९-१८९०) विल्यम अलेक्झांडर पॉल फ्रेडेरिक लुईस ( हे एक नाव आहे )  ज्याला विल्यम तिसरा म्हणून ओळखले जाते, हा त्याच्या उदारमतवादी धोरणांमुळे सर्वांना फारसा प्रिय नव्हता; मात्र नेदरलँडमधील तत्कालीन उदारमतवादी गटाने राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी पुढाकार घेतला आणि राजकन्या विल्हेलमीना (जी तमाम प्रजेची लाडकी होती ) हिच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय उत्सव सुरु केला . सर्व प्रथम ३१ ऑगस्ट १८८५ रोजी राजकन्या विल्हेलमीना (Wilhelmina ) हिच्या पाचव्या वाढदिवशी क्वीन्स डे साजरा केला गेला. १८९० मध्ये विल्हेलमीना राणी झाली आणि तेव्हा  पासून या दिवसाला "क्वीन्स डे"  हे नाव मिळाले . विल्हेलमीना ह्या राणीच्या राजवटीत नेदरलँडने दोन महायुद्धे पहिली. तिच्या कारकिर्दीत नेदरलँडने सर्वाधिक वेगवान प्रगतीसुद्धा पाहिली. ३१ ऑगस्ट हा दिवस उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा दिवस असल्याने मुलांमध्ये त्याचे विशेष महत्व वाढले. विल्हेलमीनानंतर तिची गादी चालवणारी, राणी जुलियाना हिचा वाढदिवस ३०  एप्रिल ला असल्याने १९४८ पासून क्वीन्स डे त्या दिवशी साजरा केला जाऊ लागला. राणीच्या स्वागतासाठी प्रदर्शन मिरवणूक हा पायंडा राणी  जुलियानाने पाडला. विविध वाद्यांचे ताफे आणि कलाकारांची प्रात्यक्षिके असे याचे स्वरूप असे. नवीन राणी - जुलियाना ची मोठी मुलगी-  (Beatrix) बेअट्रिक्स हिने ही पद्धत बंद करून दर वर्षी नेदरलँडमधील एका शहराला भेट देण्याचा प्रघात सुरु केला. मात्र आपल्या आई च्या स्मृतीप्रीत्यर्थ तिने क्वीन्स डे ३०  एप्रिल लाच असू दिला. काही जाणकारांच्या मते राणी बेअट्रिक्स चा वाढदिवस ३१ जानेवारी ला असल्याने व त्या दिवशी उत्सव-प्रिय "हवामान" असण्याची शक्यता कमी असल्याने , क्वीन्स डे ३० एप्रिलला  असतो.   ( सुट्टी हा प्रकार डच लोकांना फार आवडतो , त्यामुळे ३० एप्रिल ला रविवार असेल तर क्वीन्स डे आदल्या दिवशी साजरा होत आलेला आहे !)   १९६६ साली राणी जुलियानाच्या थोरल्या राजकन्येने, म्हणजेच  बेअट्रिक्स ने जर्मनी च्या प्रिन्स क्लाउस जॉर्जशी (Klaus Georg)  विवाह केला आणि जर्मन-विरोधी जनतेचा रोष ओढवून घेतला. अॅमस्टरडॅम मधील हुल्लडबाज लोकांनी हा विवाह उधळून लावण्याचा प्रयत्न केला , तसेच क्वीन्स डे च्या समारंभात अनावश्यक प्रात्यक्षिके करून विघ्न आणण्याचाही  प्रयत्न केला. पुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून स्थानिक प्रशासनाने अॅमस्टरडॅम चे सिटी सेंटर क्वीन्स डे च्या दिवशी  VrijMarkt (फ्री मार्केट ) साठी खुले केले. फ्री मार्केट म्हणजे कुठल्याही नव्या/जुन्या वस्तू कुणालाही कुठलाही कर लागू न होता विकता येणे आणि गायन-वादन -नर्तन किंवा कुठलीही कला रस्त्यावर सादर  करून पैसे मिळवणे. आजही क्वीन्स डे चे मोठे आकर्षण म्हणून अॅमस्टरडॅम मध्ये त्या दिवशी जागो-जागी फ्री मार्केट्स बघायला मिळतात. १९८० साली बेअट्रिक्स राणी झाली आणि २०१३ पर्यंत तिने हे पद भूषवले. आणि आज १०० वर्षानंतर (विल्यम तिसरा याच्या नंतर ) नेदरलँडला "राजा" मिळणार होता… पुढील वर्षी पासून किंग्स डे  साजरा केला जाईल आणि तो २७ एप्रिल ला ( नवीन राजाचा वाढदिवस )असेल. 

तर अशा ह्या क्वीन्स डे चा अनुभव घेण्यासाठी आम्ही (कौस्तुभा , रोशन,  शरण  व मी) भल्या पहाटे  (म्हणजे साडे सात वाजता) निघालो.  "खूप गर्दी असते" असे ऐकल्यामुळे सायकली न घेता मेट्रोने सेन्ट्रल स्टेशन पर्यंत गेलो. डॅम -स्क्वेअर या ठिकाणी राजवाड्या समोर प्रजा जमली होती. आम्हीही त्यात सामील झालो. वाटेत वाटलेले नारिंगी रबरी मुगुट हवा भरून फुगवले आणि ते घालून आम्ही खरेखुरे प्रजाजन झालो. नारिंगी पट्टे , मुगुट , गॉगल्स यांमुळे अनेक वाहिन्यांच्या छायाचित्रकारांचे  लक्ष आम्ही वेधून घेतले. एका उत्साही डच आजीबाईंनीसुद्धा कौतुकाने आमचे फोटो काढले.





क्वीन्स डे चा मुख्य समारंभ फारच आटोपशीर झाला. मुख्य म्हणजे वेळेवर, दहा वाजता, सुरु झाला.  राणी आणि तिचा परिवार हे समारंभासाठी दरवर्षीप्रमाणे  राजवाड्यात जमले होते. राणी Beatrix पदत्याग करून आपल्या मुलाला Alexander (नमुनेदार पाश्चिमात्य राजाचे  नाव)  अलेक्झांडरला नवीन राजा म्हणून घोषित करणार होती. राजवाड्यामधील दालनात चालू असलेला कार्यक्रम बाहेर मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपित केला जात होता. राणी आली. तिच्या झालेल्या स्वागताचा तिने नम्रपणे स्वीकार केला . कागदोपत्री सह्या होण्याअगोदर काही निवडक मंत्र्यांची प्रत्येकी मोजून दोन मिनिटांची भाषणे झाली . त्यानंतर स्वतः राणी केवळ ५ मिनिटे बोलली. सर्व काही डच मध्ये चालू असल्याने आम्हाला वेळ मोजण्याशिवाय विशेष काम नव्हते. सह्या झाल्यावर प्रजेला "हात दाखवायला " (अवलक्षण नव्हे), राजा -राणी आणि सोनेरी फ्रॉक घातलेल्या तीन राजकन्या,  राजवाड्याच्या सज्जा मध्ये आले. बाहेर असंख्य झेंडे, स्वागत-पर फलक घेऊन लोक "सज्ज" होतेच. नवीन राजाला आणि तिच्या राणीला जमलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वीकारले.

कॅमेरांचा क्लिक-क्लीकाट झाला. अकरा च्या आधी कार्यक्रम संपला होता.
माझ्या  बरोबर सुदैवाने रोहन सहस्त्रबुद्धे (पुण्याचा मित्र) आणि त्याचा आणखी एक मित्र शार्दूल असे होते : एक संपूर्ण दिवस मराठी बोलायला मिळणार होते! कौस्तुभा , रोशन आणि शरण आणि आम्ही तिघे असे आम्ही सहा जण McDonalds मध्ये नाश्ता करून शहरात फेरफटका मारावयास निघालो .

क्वीन्स डे  म्हणजे (Oranjegekte ) orange craze किंवा नारिंगी रंग उधळण्यासाठी एक निमित्त ! नेदरलँडचा राष्ट्रीय रंग असल्याने सर्व प्रमुख उत्सव आणि खेळांच्या स्पर्धा यांना हजेरी लावण्यासाठी जणू गणवेश असल्या प्रमाणे डच लोक नारिंगी रंग परिधान करतात.

काही जण खास क्वीन्स डे साठी नारिंगी मफलर , स्कार्फ , टोप्या , टी -शर्ट विकत घेतात; मात्र नारिंगी कपडेच घातले पाहिजेत असा नियम नाही. (नशीब !) गर्दी असली तरी पुण्यातल्या गणपती मिरवणुकीच्या गर्दी पेक्षा कमीच ! व्होन्डेल पार्क या ठिकाणी मोट्ठे फ्री मार्केट असल्याचे समजले होते. म्युझिअम पार्कच्या रस्त्याने तिकडे जाऊ लागलो . सर्व रस्ते स्वयंचलित वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद होते ! काही रस्ते सायकलींसाठी सुद्धा बंद होते.
अॅमस्टरडॅम सेन्ट्रल पासून म्युझिअम पार्क पर्यंत, एरवी वाहनांची गर्दी असणाऱ्या रस्त्यावरून नारिंगी रंग ओसंडून वाहत होता. व्होन्डेल पार्क अपेक्षेप्रमाणे गर्दीने फुलले होते. अनेक डच लोक सहकुटुंब कमाई करण्यासाठी आल्यासारखे दिसत होते: आई - वडील घरातील जुन्या (किंवा न आवडलेल्या नव्या )वस्तू विकत आहेत आणि तीन ते तेरा वयोगटातील त्यांची मुले नाचून , गाऊन आणि काहीतरी वाजवून पैसे मागत आहेत , असे जागोजागी दृश्य होते.

गावाकडील जत्रांची आठवण आली. फरक फक्त इतकाच होता की भारतात खेड्यांमध्ये जत्रेत कार्यक्रम करून पैसे मिळवणे ही कौटुंबिक जबाबदारी असते तर इथे ती फक्त मजा  होती. मुलांसाठी स्वावलंबनाचे "ऐच्छिक" धडे होते.   सगळीच डच मुले या फ्री मार्केट मध्ये पैसे मिळवायला येतात असे नाही , तर काही जण आवर्जून स्वस्त किंमती मध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा येतात.

व्होन्डेल पार्क मध्ये अनेक खाद्य पदार्थांच्या गाड्या सुद्धा होत्या. आम्ही ताकोयाकी   नावाचा जपानी पदार्थ खाऊन बघितला. बनवणाऱ्या जपानी मुलीला ऑक्टोपस ऐवजी शाकाहारी स्टफिंग भरायला सांगितले.

 तिथेच एका गाडीवर डोसे सुद्धा खायला मिळाल्याने आणि त्याचे विक्रेते चक्क कानडी असल्याने कौस्तुभा , रोशन वगैरे मंडळी भलतीच खूष झाली. संपूर्ण पार्क मध्ये फिरून जत्रेचा फील घेतला आणि पुन्हा सेन्ट्रल स्टेशन कडे निघालो. केवळ तिथूनच आम्हाला घराकडे जाणारी  (भुयारी) मेट्रो घेता आली असती.

 दुपारनंतर आता शहरात गर्दी वाढू लागली होती. कॅनाल्स मध्ये बोटींची संख्या वाढत होती. पुष्कळ जण बोटी भाड्याने घेऊन ती गावभर हिंडवतात : खाणे "पिणे" सर्व  काही त्या बोटवरच! बोटवर मोठ्याने म्युझिक लावून नाचणे ही इथल्या तरुण तरुणींची आवडती गोष्ट आहे.


 काही जल्लोषमय  बोटी बघून असूया वाटली ; डॅम स्क्वेअर जवळील राजवाडा अजूनही सुरक्षा रक्षकांनी वेढलेला होता : काही शिस्त बद्ध परेड्स चालू होत्या. २६  जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या परेड्सच्या तुलनेत त्या परेड्स फारच साधारण  वाटल्या. पण पाहायला आलेली गर्दी आणि त्यांच्या डोळ्यातील राणी आणि राजा विषयीचे कौतुक हेच खूप काही सांगून जात होते. संध्याकाळी अपेक्षित असलेले  अनेक मोफत (आणि कर्कश्श ) कार्यक्रम आम्ही टाळले आणि रोहन - शार्दूल  यांना अॅमस्टरडॅम सेन्ट्रल स्थानकावर निरोप देऊन आऊलेन्स्तेद ला परतलो. 
डच संस्कृतीचे, उत्सवप्रिय अॅमस्टरडॅमीय जनतेचे आणि उत्साही पर्यटकांचे दर्शन घडवणारा हा शेवटचा क्वीन्स डे (पुढील वर्षी पासून किंग्स डे ) एक चांगली आठवण बनून राहील !