Friday, August 17, 2018

डच दफनविधी : एक पुरून उरलेल्या आठवणींचा पट

नेदरलँड मध्ये आलेल्या निर्वासितांचे पुनर्वसन करणाऱ्या Hack Your Future या संस्थेत स्वयंसेवक म्हणून 
मॅटाइन आणि मी एकत्र शिकवत असू. तेथे झालेल्या मोजक्या मित्रांपैकी एक म्हणजे मॅटाइन. बहुतेक वेळा programming आणि निर्वासितांना दिले जाणारे Computer चे प्रशिक्षण यांविषयी बोलत असला, तरीहि कधी कधी रविवारच्या शिकवण्यानंतर एकत्र बिअर पिण्यास गेल्यावर तो अनेक विषयांवर सहज आणि मोकळेपणाने बोलत असे.
३० जुलै २०१८ रोजी  मॅटाइनचा अपघाती मृत्यू झाला.

थायलंड मधील लाओस भागातील जंगलात नदीमध्ये होडीने जात असताना त्याची नाव झाडाच्या खोडाला धडकून उलटली आणि नदीच्या जोरदार प्रवाहापुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याचा भाऊ आणि मित्र यांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सारे व्यर्थ गेले.  नेदरलँडला ही बातमी मिळाली तेव्हा सुन्न झालो. एरवी रोज अपघाताच्या बातम्या निर्विकारपणे वाचणाऱ्या मला, अचानक, एखाद्या अपघातामध्ये आपला मित्र सुद्धा दगावू शकतो याची जाणीव झाली. 

२०१८ च्या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये मॅटाइनला  भारत दर्शन करावयाचे होते. माझ्या  भावाचे लग्नही त्याच सुमारास होणार असल्याने मी त्याला पुण्यात येण्याचे आमंत्रण देऊन टाकले आणि आम्ही त्याची ट्रिप सुद्धा प्लॅन केली. पण प्लॅन बदलल्याने तो पुण्यात येऊ शकला नाही आणि भारतातून परस्पर तो मलेशियाला गेला. तेथून थायलंड.. त्याच्या सफरीचे किस्से त्याच्याच तोंडून ऐकायचे होते. मात्र आता ते शक्य नाही.

१६ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचा दफनविधी एक्सेन या गावी नैसर्गिक दफनभूमीमध्ये आयोजित केला होता. Hack Your Future मधील इतर ५ सहकारी/ सोबत्यांबरोबर आम्ही ठरलेल्या वेळी (दुपारी एक वाजता) तेथे पोचलो.
मॅटाइनला शवपेटिकेत ठेवून ती पेटी एका मोठ्या तोडलेल्या झाडाच्या खोडावर ठेवली गेली. त्या खोडाभवती अर्धगोलाकार अशी लाकडी बाकांची रचना केली होती जेणेकरून उपस्थितांना बसून शवपेटीचे दर्शन घेता येईल.
मॅटाइनच्या आयुष्यातील अनेक घटनांचे फोटो छापून त्याच्या प्रती एका टेबलावर ठेवल्या होत्या. प्रत्येकाला मॅटाइनच्या फोटोची एक प्रत देण्यात आली. लाकडी बाकांच्या मागे असलेल्या झाडांना लाल दोर बांधलेले  होते, ज्यावर यू-पिन च्या सहाय्याने प्रत्येकजण आपापला फोटो टांगून  मॅटाइनचे स्मरण करत होते.
शिवाय आलेल्या प्रत्येकाला आपल्या मॅटाइनविषयीच्या आठवणी डायरीत लिहायची सोय केली होती.

सर्वानी डायरीत लिहून झाल्यावर आणि शवपेटिकेला फुले वाहून झाल्यावर त्या पेटीवर मॅटाइनच्या आवडत्या वस्तू ठेवल्या गेल्या : जसे की त्याची आवडती बिअर, फ्रिसबी , ट्रेकिंगची सॅक वगैरे !
त्यानंतर मॅटाइनची आई, बाबा, भाऊ आणि थायलंड ला त्याच्या सोबत जंगलात गेलेला आणि सुखरूप परतलेला मित्र यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. मॅटाइनचा भाऊ आणि मित्र यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्याला शेवटचे जिवंत कधी पाहिले आणि त्याचे शव कसे सापडले यांच्या आठवणींनी उपस्थितांच्या अंगावर काटा आणि डोळ्यांत पाणी आले.
त्या हृदयद्रावक मनोगतांनंतर चहा-पाण्याचा  ब्रेक झाला. ब्रेक मध्ये आम्ही मॅटाइन कसा Hack Your Future साठी महत्वाचा शिक्षक होता हे सांगून त्याच्या आईचे सांत्वन केले.

ब्रेकनंतर मॅटाइनच्या आवडीचे संगीत वाजवले गेले. साडेतीनच्या सुमारास शवपेटी दफन करण्यासाठी नेण्यात आली आणि साश्रू नयनांनी आम्ही मॅटाइन ला निरोप दिला.