Thursday, January 9, 2014

युरोपिअन निसर्ग-सौंदर्याची देवता : बेल्जि"यम"


बेल्जियम : नेदरलँडच्या दक्षिणेस असलेला , आणि प्रामुख्याने डच भाषिकांचा एक छोटा आणि सुंदर देश!  अॅमस्टरडॅम मध्ये शिकायला आल्यापासून गेले वर्ष भर बेल्जियम ला जाण्याचे बेत ठरत होते आणि रद्द होत होते : कधी अभ्यास आहे म्हणून तर कधी पैसे नाहीत म्हणून ! कौस्तुभाचा भाऊ श्रीवत्सा त्याला भेटायला ऑक्टोबर च्या अखेरीस  येणार होता. त्याच्या बरोबर युरोप मध्ये कुठेतरी फिरायचे म्हणून शनिवार-रविवार बेल्जियमची सहल  आखली. रोशन , कौस्तुभा , श्रीवत्सा आणि मी असे चौघे जण!

२ नोव्हेंबर २०१३ (नरक-चतुर्दशी)  : ब्रुग्स दर्शन 

भल्या पहाटे नाही पण तरीहि लवकर उठलो. अभ्यंग स्नानासाठी आवश्यक अशा गोष्टींपैकी फक्त उटणे माझ्याजवळ होते. तेलाऐवजी पाण्यानेच अभ्यंग करून आंघोळ उरकली आणि एक छोटी सॅक घेऊन निघालो. युरो-लाईन्स  च्या बसचे बुकिंग अगोदरच केले होते. Amstelveen या स्टेशन ला उतरून तेथून बस पकडायची होती. ८ वाजताच्या बससाठी साडेसात वाजता "चेक इन " केले. बस नंबर ७ मिळाला.  युरो-लाईन्स च्या आवारात उभ्या असलेल्या बसेस पैकी ७ नंबर कुठेच न दिसल्याने आम्ही बाहेर उगाच भटकत राहिलो.  धुक्यात हरवलेल्या परिसराला स्वतःची ओळख सांगता येत नव्हती. हलकासा पाऊस सुद्धा असल्याने कुंद झालेली हवा आणि  धूसर झालेले वातावरण यांमुळे सकाळ प्रसन्न दिसत होती. थोड्याच वेळात आमचा चालक हातात ७ नंबर घेऊन आला. हा चालक बऱ्यापैकी उर्मट या विशेषणाचा नमुना होता. गरीब बिचाऱ्या परदेशी नागरिकांवर अस्सल डच मध्ये डाफरून तो सहकारी चालकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे  मनोरंजन करत होता.

सव्वा आठ वाजता बस निघाली. Wi-Fi ची सुविधा असल्याने वेळ कसा घालवावा हा प्रश्न नव्हता ; मात्र खिडकी जवळची जागा मिळाली असल्याने बाहेरील निसर्ग(तः) (असेलेले ) सौंदर्य पाहण्यात प्रवास सुखकर झाला.
नेदरलँडची सीमा ओलांडल्यानंतर एका पेट्रोल पंप पाशी बसने विश्रांती घेतली. आम्ही सुद्धा खाली उतरून पाय मोकळे केले, कॅमेरा बाहेर काढून हात सुद्धा मोकळे केले !
बसने ब्रुसेल्स-उत्तर या स्थानकापर्यंत ला पोचावयास अंदाजे अडीच  तास घेतले.  तेथून आम्हाला 'बृग्स" (Brugges, याचा डच मध्ये उच्चार "ब्रुह" असा होतो) ला जाणारी ट्रेन पकडायची होती. योस या बेल्जिअन मित्राने ने सांगितलेल्या माहितीनुसार तिथला ट्रेनचा एक-दिवसाचा पास घेतला. आणि वेळेवर फलाटावर पोचलो. नेदरलँडशी तुलना करता तेथे चकचकीतपणाचा अभाव होता. साधेच पण स्वच्छ असे रेल्वे स्थानक होते. ११:१८ ची रेल्वे वेळेवर आली आणि (आम्हाला घेऊन )निघाली.

बृग्स स्थानकाबाहेर Panos मध्ये सॅंडविचेसचे जेवण करून एक बऱ्यापैकी मोठा आणि रस्ते स्पष्ट दिसतील असा नकाशा विकत घेऊन आम्ही शहरात फेरफटका मारावयास निघालो.
बृग्स हे शहर  "पश्चिम फ्लांडर्स " या प्रांताची (Province) राजधानी असून निसर्ग तसेच मानवनिर्मित सौंदर्याने नटलेले आहे. या शहराला चित्रकलेचा आणि स्थापत्य कलेचा मोठा इतिहास लाभला आहे. मध्ययुगीन तसेच  आधुनिक  कला यांच्याशी नातं सांगणाऱ्या अनेक कलाकृती येथे पहावयास मिळतात. या कलाकृती आणि फ्लेमिश प्राचीनता (Flemish Primitives ) म्हणून ओळखली  जाणारी "डच चित्रे" जतन करणारी अनेक संग्रहालये यांमुळे "युनेस्को" च्या जागतिक वारसा स्थानांमध्ये "बृग्स"ला स्थान आहे.

विकीपिडिया वर असणारी एखाद्या ठिकाणची चित्रे प्रत्यक्ष दिसतात , याची प्रचीति बृग्स मध्ये फिरताना येते. लांबून बघितले असता खोटी वाटावी अशी,  चित्रवत भासतील इतकी सुंदर घरे , कालव्यांच्यामध्ये आपले प्रतिबिंब दाखवत दिमाखदारपणे उभ्या असलेल्या इमारती , आजूबाजूच्या परिसराची शोभा वाढेल या अनुषंगाने स्वतःहूनच नीट-नेटकी वाढलेली झाडे आणि या सगळ्याला पूरक अशा देखण्या डच युवती असे बृग्स चे थोडक्यात वर्णन करता येईल.

दारू आणि चॉकलेट्स ही बेल्जियम ची खास आकर्षणं ! मार्केट एरियात असणाऱ्या एका अस्सल फ्लेमिश दारुभट्टी ला आम्ही भेट दिली आणि बिअरची एक बाटली विकत घेतली.

अनेक दुकानांत चक्कर टाकून विंडो शॉपिंग केली. चॉकलेट्सची अनेक दुकाने पालथी घालून "माझंपाईन" नावाची  बदामाची फ्लेमिश मिठाई आणि काही नमुनेदार फ्लेमिश ट्रफ़ेल्स विकत घेतले.

सुट्टीचा दिवस असल्याने शहरात पर्यटकांची ही गर्दी उसळली होती. नावालासुद्धा गाडी दिसत नव्हती. सर्व जण पायीच फिरताना दिसत होते. अरुंद रस्ते असल्याने गाडीची चैन शहराला सौंदर्य टिकवण्यासाठी मारकच होती. क्वचितच एखादी घोडागाडी दिसली की उगाच आपण time machine मध्ये बसून सोळाव्या शतकात आलेलो आहोत असे वाटत होते.  सूर्याचे दर्शन अधून-मधूनच  होत होते.
 


एक म्हातारा अजब असे सूरवाद्य घेऊन बसला होता. फक्त चक्र फिरवले की त्यातून हार्मोनियम प्रमाणे सूर निघत होते.
आम्ही ते वाद्य वाजवून बघितले.

कुठल्याही कमानीतून आत शिरलो तरी काहीतरी भव्य-दिव्य बघायला मिळणार याची खात्री होती. काही वेळा तर एका ठिकाणाहून पंधरा-पंधरा मिनिटे आमचा पाय निघत नसे. एखाद्या वास्तूची काळजी घेण्याची आणि जपण्याची अतिशयोक्ती केल्याचेही काही ठिकाणी जाणवते. इतकी आखीव-रेखीव आणि सुसंबद्ध रचना एखाद्या शहराची कशी असू शकते असा प्रश्न पाहणाऱ्याला नक्कीच पडतो.

"होली ब्लड" या नावाने प्रसिद्ध असणारे चर्च हे आम्ही ठरवलेल्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत होते. होली ब्लड च्या या  Basilica मध्ये ( दुतर्फा खांबांची रांग व अर्धवर्तुळाकार घुमट असलेला प्राचीन रोममधील लांबट आकाराचा दिवाणखाना) येशूच्या पवित्र रक्ताचे अवशेष आहेत. येथे मेण-पणत्या लावून आम्ही दिवाळी साजरी केली (!) 

या चर्च मधून बाहेर येताना आम्हाला एक भारतीय जोडगोळी भेटली : अतुल आणि सुनील !
दोघेही फ्रांस मधील "लिल" येथे पी. एच. डी. चे विद्यार्थी होते आणि सहलीसाठी आले होते. आमचा ग्रुप आता सहा जणांचा झाला. मार्केट स्क्वेअर मध्ये येऊन आम्ही नकाशाचा पुन्हा अभ्यास करून परतीचा मार्ग ठरवला. 
मार्केट स्क्वेअर हा बृग्स मधील मध्यवर्ती चौक असून अनेक स्तंभ आणि मनोरे यांमुळे तो मनोरम झाला आहे.  येथून बृग्स च्या चारही कोपऱ्यांत जाण्यासाठी बस-सेवा उपलब्ध आहे , तसेच विविध हॉटेल्स आणि रंगीबेरंगी दुकाने यांमुळे हा परिसर सदैव गजबजलेला असतो. 

आता आम्हाला पवनचक्क्या बघायला शहराच्या एका टोकाला जायचे होते आणि तेथून परत बृग्स रेल्वे स्थानकापर्यंत येण्यासाठी बस ! सुदैवाने रस्ते पटापटा सापडले. आणि डच बोलायची वेळ आली नाही. वाटेत चॉकलेट्स- बिस्किटे वगैरे खरेदी झाली . 
तीन पवनचक्क्यांपैकी दुसरीला कुंपण नव्हते. आम्ही साहस  करून वर पर्यंत चढून गेलो. पाऊस सुरु झाला होता. पवनचक्कीवर बसून बेल्जिअन बिअर चा आस्वाद घेतला.  बृग्स मध्ये एक आदर्श आणि स्मरणीय बेल्जियन-संध्याकाळ व्यतीत केली !

 शहरातील मध्यवर्ती भागातून जात आम्ही एका अर्थाने शहराला अर्धी प्रदक्षिणा घातली होती. परत फिरून मार्केट स्क्वेअर पाशी आल्याशिवाय बस मिळणार नव्हती. दिवस भर फिरून थकलेल्या पायांना ओढत आम्ही बस मिळवली.
स्थानकाजवळ असणारे "सबवे " गाठले आणि आपापले आवडते सॅंडविच बनवून घेतले.
बृग्स हून ब्रुसेल्स हा प्रवास ठरल्याप्रमाणे रेल्वेने केला. हॉस्टेल शोधताना मात्र आम्हाला विशेष कष्ट आणि मदत घ्यावी लागली. आम्हा कुणाचेही मोबाईल्सवरचे इंटरनेट बेल्जिअम मध्ये चालत नव्हते.  ब्रुसेल्स-उत्तर या स्थानकापासून होस्टेल ला जाण्यासाठी होस्टेल चा पत्ता बघून , मेट्रो चा नकाशा आणि रूट बघून अंदाजाने आम्ही दोनदा मेट्रो बदलून इच्छित थांब्यापाशी उतरलो. विचारत विचारत जात असताना एका भारतीय माणसाचे दुकान दिसले आणि त्याने आम्हाला योग्य मार्ग दाखवला. बारा वाजण्यापूर्वी चेक-इन करणे जरुरी असल्याने आमची धांदल उडाली होती. पावणे बारा वाजता ते युथ हॉस्टेल सापडले आणि आम्ही हुश्श केले. उद्याचे सर्व बेत कौस्तुभा आणि मी मिळून ठरवले आणि झोपी गेलो.


३ नोव्हेंबर २०१३ (लक्ष्मीपूजन ):   ब्रुसेल्स
हॉटेल चा (फ्री) नाश्ता सकाळी लवकर असल्याने सकाळी लवकर उठणे क्रमप्राप्त होते. नाश्त्याला नमुनेदार डच ब्रेड्स, ज्युसेस वगैरे होते. नाश्ता आणि चेक आउट करून आम्ही Atomium बघायला निघालो. बरोबर रस्ता शोधत आता एक दूरच्या मेट्रो स्थानका पर्यंत चालत जायचं  होतं.
लोखंडाच्या स्फटिकाची मोठ्ठी प्रतिकृती म्हणजे "Atomium" ही वास्तू !  या वास्तूचा इतिहाससुद्धा मोठा रंजक आहे:
Expo ५८ या प्रदर्शानासाठी बेम्जियमची निवड झाली होती. त्यासाठी १९५४ पासूनच नयनरम्य असा मनोरा उभारायचे फ्लेमिश लोकांनी  ठरवले होते. १९५० च्या सुमारास दूरदर्शन च्या प्रसारामुळे आणि लोकप्रियतेमुळे रेडिओ चा खांब (mast ) उभारावा असेही अनेक इमारत अभियंते आणि अर्किटेक्टस चे मत होते. बेल्जिअन स्थापत्य अभियंता आंद्रे वटेर्केन याला निसर्गतः घनाकृती असणाऱ्या लोखंडाच्या स्फटिका-विषयी माहिती होती. त्याच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना:  लोखंडाचा एका  स्फटिकाच्या  १६५०० कोटी पट मोठा असा स्फटिक जर बांधला तर तो आकार नक्कीच अद्वितीय होईल.

१०२ मीटर उंच अशा या इमारतीमध्ये ९ गोल असून प्रत्येक गोलाचा व्यास १८ मीटर आहे. घनाच्या आठही बाजूंना एक एक गोल आणि मध्ये एक गोल , अशा लोखंडाच्या स्फटिकाला ते सादर करतात.  घनाच्या बारा बाजू आणि मधील गोलाला जोडण्यासाठी आठ नळ्या , अशा एकूण २० नळ्या मिळून या स्फटिकाला बांधतात. प्रत्येक नळी साडेतीन मीटर जाड आहे.

कल्पकता आणि नाविन्य यांना उत्तेजन देण्यासाठी याची निर्मिती केली गेली आणि जगभरातील नानाविध शोध आणि नूतन कल्पनांचे आणि प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन येथे भरवण्यात आलेले आहे. आण्विक उर्जेचा उपयोग युद्धासाठी न होता शांतीसाठी व्हावा हा उदात्त हेतू सुद्धा विविध तक्ते टांगून मांडला आहे.
प्रत्येक गोलाकार अणू मध्ये जाण्यासाठी उद्वाहक आहे, शिवाय Escalators (वर- खाली जा ये करण्यासाठी जिने ) सुद्धा आहेत. 

" Atomium" नंतर आम्ही पुन्हा शहराच्या मध्यवर्ती भागाकडे मोर्चा वळवला. Grand Place या मार्केट एरिया पासून आम्ही सुरवात केली. हलका पाऊस सुरु झाला होता, त्यामुळे दिवस वाया जाणारा की काय अशी भीती वाटून गेली.ढगांच्या आडून आडून सूर्य अधून मधून दर्शन देत होता. सगळे ऋतू अनुभवता येतील याची काळजी निसर्गाने घेतली होती. ब्रुसेल्स सिटी सेंटर मध्ये बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत आणि खाऊन बघण्यासारखे अनेक पदार्थ सुद्धा !
आम्ही शहरात फेरफटका मारताना रस्त्यावरील एक कारंजं आमचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलं. पाय धुण्या- व्यतिरिक्त त्याचा उद्देश काय असू शकतो ते मात्र कळलं नाही. 











 बेल्जियम  Waffels साठी प्रसिद्ध आहे. या पदार्थाचा आस्वाद घेण्यासआम्ही आतुर होतो. मार्केट मध्ये पुष्कळ ठिकाणी Waffels असल्याने आणि दर-वेळी इथे यायला जमणार नसल्यामुळे आम्ही "दर" न बघताच "उदर"भरण केले. फ्रेंच फ्राईज आणि वाफाळते "वाफे"ल्स  यांनी भुकेचा प्रश्न सोडवला.

सेंट-निकोलस चर्च हे आम्ही भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक ! चौदाव्या लुईच्या काळातील आकर्षक फर्निचरचा प्रभाव या चर्च वर दिसतो. चर्चमधील stall, वेदी, वगैरे गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.      ई.स. १३८१ ला प्रथम choir बांधून सुरवात केलेल्या या चर्चची अनेक वेळा पुनर्रचना करण्यात आलेली आहे. आत मध्ये बेल्जियम चा इतिहास सांगणारी शिल्पे , हलणारी मॉडेल्स, चित्रे यांची रेलचेल आहे. शिवाय युरोपचा सोपपत्तिक इतिहास सांगणारा माहितीपट सुद्धा एका पडद्यावर दाखवला जात होता.


चर्चच्या परिसरात अनेक मोठ्या आणि आकर्षक इमारती होत्या , मात्र वेळेअभावी आम्ही त्यांना वळसा घालून पुढे गेलो.
 Manneken Pis (शू करणारा लहान मुलगा) ही वामनमूर्ती हे पुढील आकर्षण होते. एका चौकात कोपऱ्यावर असणाऱ्या शू करणाऱ्या एका लहान मुलाचे दीड फुटी कारंजं म्हणजे नेमका काय प्रकार आहे याची चौकशी आम्ही आधी केली होती: अनेक आख्यायिकांपैकी आवडीने ऐकली जाणारी एक पुढीलप्रमाणे : "Godfrey तिसरा"हा राजा हा दोन वर्षांचा असताना Leuven या प्रांताचा सरदार झाला. तेव्हा त्यांच्यावर Bertouts या Grimbergen या प्रांताच्या राजाने आक्रमण केले. तेव्हा लढण्यासाठी स्फूर्ती यावी म्हणून सैनिकांनी त्या "बाळ -राजाला" एक झाडाला टांगून ठेवले असता त्याने शत्रु-सैन्याला आपले "पाणी" पाजले ! आणि ती लढाई Leuven चे सैनिक जिंकले. या प्रसंगाची स्मृती म्हणून हा पुतळा उभारला गेला. 


हे अनोखे कारंजं पाहून मग आम्ही परतीचा रस्ता धरला. पावसाने आम्हाला वाटेत गाठले. आम्हाला गिफ्ट्स ची खरेदी करायची होती. पोस्ट कार्डस,  बिस्किटे, चॉकलेट्स, ग्लासेस, (कान)टोप्या अशी खरेदी झाली. "ब्रुसेल्स-उत्तर" स्थानकाहून आमची बस आठ वाजता निघणार होती. पावसात भिजत धावत-पळत स्टेशन कडे निघालो आणि बस "पकडली".  साडेदहाच्या सुमारास प्रिय अॅमस्टरडॅमला परतलो. ऐन दिवाळीत केलेल्या दोन दिवसांच्या सहलीचा शेवट 
हॉस्टेल मधील शेजाऱ्याने बनवलेले गरमागरम सूप पिऊन झाला. 

बेल्जियम मधील दोन प्रमुख शहरे पाहून झाली होती. ब्रुग्स आणि ब्रुसेल्स दोन्ही वेगळ्या धाटणीची आणि स्वतःची स्वतंत्र ओळख जपणारी आहेत. ब्रुसेल्स मध्ये फ्रेंच भाषा डच इतकीच बोलली आणि लिहिली जाते, तर ब्रुग्स मध्ये फ्रेंचला मुळीच थारा नाही. ब्रुसेल्स मध्ये उंच इमारती व शहरी थाट आहे तर ब्रुग्स मध्ये बसकी घरे व ग्रामीण गजबजाट आहे.
पण एकूणच ब्रुग्स , ब्रुसेल्स या दोन्ही युरोपियन शहरांत फिरताना एक प्रकारचा "जुना" वास येत राहतो. वास्तू जिवंत वाटतात आणि त्यामधील वस्तूही ! नवे राज्य राखताना या गड्यांनी "नवा गडी -जुने राज्य" हा मंत्र जपला आहे. 


संदर्भ :
http://en.wikipedia.org/wiki/Bruges
http://en.wikipedia.org/wiki/Brussels
http://en.wikipedia.org/wiki/Manneken_Pis

छायाचित्रे : उन्मेष जोशी