Sunday, December 30, 2012

रॉटरडॅम सहल : नाताळ विशेष!



२४ डिसेंबर २०१२:

नुकताच ख्रिसमस  ब्रेक सुरु झाला होता. परीक्षेनंतर भटकायला कुठे ना कुठे तरी जायचे असे ठरवले होतेच.
एका दिवसात बघून परत येत येईल अशा "रॉटरडॅम" ला भेट द्यायचे  बहुमताने  नक्की केले. शरण, कौस्तुभा , मी , रोशन व त्याचे स्पेन हून आलेले मित्र : नवनीत, अयाज , जवाद ; असा आमचा सतरंगी ग्रुप जमला.

सकाळी ७ वाजता निघायचे ठरले होते. फोडणीचा भात आणि सॉस असा नाश्ता करून  "अपेक्षेप्रमाणे" आम्ही ९:१५ वाजता Uilenstede (आमचे राहायचे ठिकाण) सोडले. "अॅमस्टरडॅम Zuid (दक्षिण)" या स्थानकाहून ट्रेन ९.४६ ची पकडायची होती. धावत-पळत जाऊन ट्रेन खरोखरच "पकडली". स्कीफोल (Schiphol ) स्थानकाला ट्रेन बदलली. या ट्रेनने  रॉटरडॅम ला पोचायला अकरा वाजणार होते. आता सर्वांनी खिडक्या पकडल्या आणि बाहेरील दृश्ये आपापल्या कॅमेरा मध्ये पकडण्यास सुरवात केली. "ट्रेन मध्ये बिस्किटे किंवा तत्सम खाल्ले नाही तर ट्रीप झाल्यासारखी वाटत नाही" या माझ्या टिप्पणी ला पाकिस्तानी मित्रांकडूनही दाद मिळाली. शरणने आणलेली चॉकलेट-बिस्किटे आणि मी आणलेली मोसंबी संपायला फारसा वेळ लागला नाही. जवाद कडे GPS device असल्याने त्याला "Walking GPS " असे नाव दिले गेले. तो आमचा अनभिषिक्त "गाईड" होता. 

रॉटरडॅम ला उतरल्यानंतर त्याने ही भूमिका चोख बजावली. रॉटरडॅम सेन्ट्रल स्थानकापासून आमची छोटी रेल्वे निघाली. जवाद हे इंजिन.. आणि आम्ही डबे! रॉटरडॅममधील म्युझियम्स असलेल्या रस्त्याने आम्ही पर्यटन सुरु केले. एका दिवसात सर्व म्युझियम्स बाहेरून बघणे सुद्धा अशक्य होते.  Martiem म्युझियम च्या इथे जर वेळ घालवला. 

या Open Air म्युझियम मध्ये अनेक जहाजे ठेवलेली (!) आहेत आणि यातील बहुतेक जहाजे सुस्थितीत असून त्यावर फिरता देखील येते. या म्युझियम च्या जवळच "Walk of  Fame" हा स्पॉट आहे असे GPS ने सांगितले होते ; चौकशी केल्यावर कळले की नूतनीकरणामुळे त्या "फेम"स फरश्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत.
 जहाज-म्युझियम च्या जवळच आकाशाकडे हात केलेल्या हृदय नसलेल्या माणसाचा पुतळा नजरेत भरतो. १९४० साली जर्मनीने केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये संपूर्ण शहर नष्ट झाले होते (अपवाद फक्त St. Lawrence चर्चचा), त्याच्या स्मरणार्थ Ossip Zadkine नावाच्या विख्यात शिल्पकाराने घडवलेले हे शिल्प "The Destroyed City" म्हणून ओळखले जाते.
 
Statue of Erasmus ला जाताना शहराचे सुंदर दर्शन घडले. सुदैवाने पाऊस नव्हता. ख्रिसमस चा मूड शहराच्या गल्ली-गल्ली तून जाणवत होता. जागोजागी ख्रिसमस मार्केट्स आणि रॉटरडॅमला आलेले आमच्यासारखे असंख्य पर्यटक यांनी मुख्य रस्ते फुलून गेले होते. प्रामुख्याने जाणवलेली आणि अॅमस्टरडॅम मध्ये नसलेली गोष्ट म्हणजे अनेक चौकांत उभारलेले लहान-मोठे मनोरे.. मनोरे कसले, एखादी बिल्डींग बांधून झाल्यावर सिमेंट उरले की जवळच्या चौकात त्याची एक उंच भिंत उभारणे हा इथल्या बिल्डर्स चा उद्योग असावा..


St . Lawrence चर्च ! रॉटरडॅममध्ये उभी असलेली एकमेव मध्ययुगीन इमारत! भव्य-दिव्य अशी ही इमारत आम्ही फक्त फोटो काढण्यापुरती पाहिली.  स्थापत्य शास्त्राचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही. 

या चर्चच्या समोर Erasmus यांचा १६२२ साली बांधलेला ब्राँझ चा पुतळा आहे. Erasmus हे रॉटरडॅममध्ये जन्मलेले एक थोर युरोपिअन तत्वज्ञ आणि विद्वान होत. विकिपीडिया वर त्यांची माहिती वाचून इतिहासाच्या पुस्तकाची आठवण होते: "मानवतावादी", "सहिष्णू" , "तत्ववेत्ता" असले शब्द केवळ इतिहासाच्या पुस्तकातच वाचल्याचे आठवतात ! 

नवनीत, अयाज  आणि जवाद हे तिघेही Erasmus  Mundus या program द्वारे स्पेनमध्ये आलेले असल्याने 
कृतज्ञता म्हणून त्यांनी त्या पुतळ्याला सलाम केला.

Cube  Houses आणि पोर्ट ही पुढील प्रमुख आकर्षणे होती. 
Cube Houses हा एक मोठाच विलक्षण प्रकार होता. षटकोनी खांबावर ठेवलेला ४५ अंश कोनात झुकलेला एक घन म्हणजे घर.. अशी ही संकल्पना आहे. शब्दांत मांडण्याचा हा एक प्रयत्न , जो कितपत सफल झालाय हे खालील चित्र पाहून ठरवा..


A picture  says  thousand words ! या "हटके" घरांमध्ये माणसे राहतात. उत्सुक पर्यटकांचा त्रास सर्वांना होऊ नये म्हणून इथल्या एका माणसानी त्याचे घर पर्यटकांसाठी खुले केले आहे आणि तो चक्क त्याच्या घरात येण्यासाठी तिकीट घ्यायला लावतो!!!! अडीच युरो! त्या बिचाऱ्याचे  घर त्या "घन"दाट  जंगलात अगदीच "आत" असल्याने त्याच्या शेजाऱ्यांना पर्यटकांना त्याचा पत्ता सांगण्याचा थोडा त्रास पडतोच. त्या घनात (घरात) आमच्या ट्रिक फोटो-ग्राफीला ऊत आला. 
Cubes च्या जंगलातून बाहेर पडल्यावर सर्वांना भुकेची जाणीव झाली. एका छोट्याश्या हॉटेलात जेवण उरकले. फ्रेंच फ़्राइज हा सर्वांत आवडलेला पदार्थ! (यावरून जेवणाची कल्पना येऊ शकेल)

रॉटरडॅमचे पोर्ट हे पुढील आकर्षण होते. Water Front दिसण्यासाठी बरेच चालावे लागणार होते. अर्थात जवाद ने अंतराची काहीच कल्पना न देता "जवळच आहे" असे सांगून सर्वांना चालवले. प्रत्यक्षात जेव्हा जलाशयाचा किनारा पाहिला तेव्हा त्या चालण्याचे काही वाटेनासे झाले. थेट मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ची आठवण करून देणारे ते ठिकाण अंगावर रोमांच आणणारे होते.

 जलाशयाच्या किनाऱ्यावरून Erasmus bridge पर्यंत walk साठी निघालो. वाटेत International Flag Parade या भागात रॉटरडॅममध्ये ज्या ज्या देशांचे लोक राहतात त्या त्या  सर्व देशांचे झेंडे लावले आहेत. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांचे झेंडे शोधून एकमेकांचे फोटो काढून घेतले :-) 

 Erasmus bridge च्या सुरवातीला दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या नाविक दलातील जवानांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारलेले दिसते. "De Boeg " ("The bow" किंवा नमस्कार) असे याचे नाव. Fred Carasso या शिल्पकाराने घडवलेले ४६मीटर उंचीचे हे शिल्प Erasmus bridge च्या पार्श्वभूमीवर उठून दिसते.

उत्तर आणि दक्षिण रॉटरडॅमला जोडणारा Erasmus bridge देखणा आहेच. शिवाय Tour de France , Red Bull Air Race अशा स्पर्धांमुळे सर्वांत प्रसिद्ध पूल म्हणून प्रसिद्ध  आहे(!) सर्व जण आता घरी परत जाण्याची घाई करत असल्याने मी व कौस्तुभ अक्षरशः पळत-पळत जाऊन पुलावर गेलो. भर्राट वारा, रंगीत ढग आणि संधिप्रकाशात न्हाऊन निघालेला रॉटरडॅमचा जलाशय हे सर्व मनात साठवून परत निघालो.

(फोटो क्रेडिट्स : विकिपीडिया, अयाज, उन्मेष )

Monday, November 19, 2012

"अॅम"ची दिवाळी

नोव्हेंबर २०१२

"यंदा दिवाळी अॅमस्टरडॅम मध्ये साजरी करायची आहे", हा विचार खूप आधीच मनात डोकावून गेला होता, अगदी फ्राय  (VRIJE ) युनिवर्सिटी मध्ये अॅडमिशन मिळाल्यापासून "तिकडे गेल्यावर आपण आपले सण कसे साजरे करू अशा कल्पना मी रंगवू लागलो होतो. गणपती उत्सवानंतर आलेला "दिवाळी" हा पहिलाच मोठा सण ! 

३ नोव्हेंबर लाच अॅमस्टरडॅम मध्ये राहत असणाऱ्या भारतीय लोकांनी दिवाळी उरकली होती. ती अशा प्रकारे: एका मैदानावर मांडव-सदृश आडोसा उभारून आत मध्ये विविध भारतीय खाद्य पदार्थांची दुकाने, एका बाजूला स्टेज ज्यावर दिवाळीशी बादरायण संबंध असणार नाही असे कार्यक्रम (उदाहरणार्थ सालसा डान्स !!) आणि दिवाळीचा फील येण्यासाठी संध्याकाळी फटाके! त्यासाठी इथे म्युनिसिपालिटी ची परवानगी घ्यावी लागते (पैसे भरून)! शोभेचे फटाके उडवण्यास सुद्धा कायद्याने बंदी आहे... त्या ठिकाणी (अम्स्तेल्वीन  सेंटर, जेथे दिवाळी साजरी केली जात होती ),  शनिवार पेठेतील एखादे आठ वर्षांचे पोर भाऊबीजेच्या दिवशी जेवढे  फटाके उडवेल , तेवढेच फटाके (जेमतेम ५ मिनिटे) उडवण्यात आले. ते बघण्यासाठी मी कौस्तुभा बरोबर गेलो होतो; "अगदीच काही नसण्यापेक्षा हेही नसे थोडके"!


वसुबारस: (१० नोव्हेंबर)
इथे गाय (जिवंत) बघायला मिळणे मुश्कील होते, तेथे वासरू शोधून त्याला धने-गूळ  यांचा नैवेद्य देणे हे महा-मुश्कील काम होते. कालनिर्णय बघून दिवस लक्षात होता इतकेच.

धनत्रयोदशी: (११ नोव्हेंबर)
सूर्य खूप दिवसांनी दिसला. दुपारी अॅमस्टेल पार्क येथे फिरावयास गेलो. घरापासून जवळ असलेल्या या पार्क मध्ये प्राणी सुद्धा आहेत, असे समजले होते. त्यांत उल्लेखनीय म्हणजे "पांढरा कांगारू" !


White Kangaroo @ Amstel park, Amstelveen, Netherlands

 रविवार असल्याने बागेत "अपेक्षित" गर्दी होतीच. शरद ऋतुचा प्रभाव वृक्षांवर जाणवत होता. पानांनी फुलांचे  रंग धारण करून झाडांना एक निराळीच आकर्षकता प्राप्त करून दिली होती. 
A beautiful tree in Amstel park, Amstelveen

बागेतून घरी आल्यावर भारतातल्या घरी सर्वांबरोबर video  कॉल  केला. माझी लाडकी भाची ओजस्वी आणि पल्लवी-किरण यांच्याशी सुद्धा video  कॉल  करून बोललो. त्यांच्या घरातील  आकाश-कंदील, दिवे  बघितले.
धन्वन्तरीचा श्लोक आणि शुभ दीपावली चे ई-मेल आप्तेष्टांना पाठवून मनाचे समाधान करून घेतले.


नरक-चतुर्दशी - लक्ष्मीपूजन: (१३ नोव्हेंबर)

दुपारी  कॉलेज  होते; मात्र संध्याकाळी "मानसा" च्या बिल्डींग मध्ये तिच्या मजल्यावर आम्ही दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते. कॉलेज हून घरी आलो तेव्हा घरून आलेले पार्सल (फराळाचे ) माझी वाट  पाहत होते...इतका आनंद पहिला पगार मिळाल्यावर सुद्धा झाला नव्हता! 
त्याप्रमाणे सात वाजता तिच्या रूमवर जमलो. लक्ष्मीची (रुपये आणि युरो दोन्ही) पूजा केली. नाण्यांचे स्वस्तिक बनवले.कौस्तुभा ने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून दिली, त्यामुळे सोन्याची पूजा सुद्धा करता आली. स्वस्तिक व सोन्याला  हळद-कुंकू व फुले वाहून, गणपतीची व महालक्ष्मीची आरती म्हटली. येणाऱ्या सर्वांना कुंकवाचे गंध लावण्यात आले. नरक-चतुर्दशीची गोष्ट (कृष्ण-सत्यभामा व नरकासुर) सांगण्यात आली आणि प्रसाद म्हणून शंकरपाळे देण्यात आले. दिवाळीमध्ये "दिवे का लावतो"  याची आपापल्या परीने उत्तरे दिली.
यानंतर एकत्र स्वयंपाक केला: भात-सांबार, चना-मसाला, पाणी-पुरी (मसाला रेडीमेड), आणि जिलेब्या!
जेवण करण्या-अगोदर डायनिंग टेबल वर छोटेखानी  दीपोत्सव केला.

पणती व स्वस्तिक यांचे आकार साकारले होते. दिवाळीचा खऱ्या  अर्थाने फील आला. यानंतर मानसा च्या कोणा-एका मैत्रिणीने काहीतरी समज करून घेऊन हिंदी (bollywood )गाणी लावली. मग त्यावर ओघाने डान्स! इथे कुठलीही गोष्ट साजरी करताना (celebrate ) करताना, डान्स हा अविभाज्य भाग असतो, हे एक निरीक्षण!
जेवण सर्वांना आवडले आणि तृप्त मनाने आम्ही आपापल्या घरी परतलो. मी घरात लक्ष्मीपूजन केले, महालक्ष्मीची आरती केली आणि "दिवाळी साजरी झाली" या आनंदात  झोपी गेलो.

बलि-प्रतिपदा (पाडवा) : १४ नोव्हेंबर 
औक्षण व्हायला हवे होते, इतकेच या दिवसाचे माझ्या लेखी महत्व होते.
संध्याकाळी आईने video कॉल वर ओवाळले त्यावेळी माझी मैत्रीण टाटीयाना हिच्याकडून ओवाळून घेतले. आईकडून होणाऱ्या औक्षणाचे महत्व सांगितल्यावर  तिच्या डोळ्यात तरारलेले पाणी खूप काही सांगून गेले. 
काहीतरी गोड म्हणून मी आज गाजर हलवा करण्याचा घाट  घातला होता. गाजरे किसताना हात दुखून आले. घरी आई ला "आज गाजर हलवा कर" असे सांगणे खूप सोपे होते. प्रत्येक हिवाळ्यात किती वेळा गाजर हलवा केला हे आईला मोजून  दाखवणारा मी , त्याबद्दल स्वतःची लाज वाटत होती. माझे सर्व चोचले पुरवणारी माझी आई, माझ्या हातचा गाजर हलवा खायला त्या दिवशी तिथे  माझ्या-जवळ हवी होती. असो. कौस्तुभ-मानसा ,रोशन ,शरण व निशांत  यांना गाजर हलवा खिलवला. त्या दिवशी  समजले - न खाता सुद्धा पोट कसे भरते ते...
गाजर हलवा (carrot pudding)

Wednesday, October 31, 2012

युनिवर्सिटी आणि मी



युनिवर्सिटी मधील वातावरण :

माझ्या युनिवर्सिटीचे नाव "VRIJE "(याचा उच्चार फ्राय असा होतो, ज्याचा तळण्याशी काही संबंध नाही आणि याचा अर्थ फ्री असा होतो, मात्र इथे शिकण्याची फी वार्षिक १२,००० युरो (म्हणजे साधारण साडे-आठ लाख) आहे )!
इंग्रजी मध्ये भाषांतर केल्यास "FREE UNIVERSITY " असे  ऐकून बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज होत असे, म्हणून आता युनिवर्सिटी चे इंग्रजी नाव VU UNIVERSITY असे सांगतात! तर अशी ही VRIJE युनिवर्सिटी अॕमस्टरडॕम
मधील एक नावाजलेली युनिवर्सिटी आहे. जवळ-जवळ १०० हून अधिक देशांचे विद्यार्थी येथे दर-वर्षी शिकत असतात. (वानगी म्हणून माझ्या वर्गात रुमानिया, इटली, ग्रीस, अमेरिका, वगैरे देशांचेचे अनेक विद्यार्थी आहेत)

पहिल्या दिवसापासूनच INTERNATIONAL फील यायला सुरवात झाली. वर्गांत शेजारी बसणारा मुलगा किंवा मुलगी फार तर दुसऱ्या राज्यातून आला असेल, अशी पुण्यातील सवय! आता मात्र शेजारचा विद्यार्थी हा थेट दुसऱ्या खंडातून आलेला असू शकतो, हे जाणवले. इंग्रजी ही एकाच सर्वांना समजेल अशी भाषा..तीही सर्वांना समजेल अशा प्रकारे बोलता येणे इथे आवश्यक आहे. अमेरिकन आणि इंग्लिश मुलांची इथे त्यामुळे गोची होते; त्यांचे फाडफाड इंग्रजी सामान्य डच लोकांच्या डोक्यावरून जाते. "भारतीय इंग्रजी" इथे खूप APPRECIATE करतात, कारण उच्चार शुद्ध आणि पूर्ण असतात!


प्रोफेसर कमाल रे , (पण) अखियो से गोली  मारे....

युनिवर्सिटी मध्ये शिकायला अतिशय उत्तम ENVIRONMENT आहे. सर्वच प्रोफेसर्स स्वतः RESEARCHER असल्याने स्फूर्ती घ्यावी असे आहेत. अनेक वर्ष शिकवत असूनही प्रत्येक लेक्चर व्यावसायिक पणे तरीही विद्यार्थ्यांना रस वाटेल अशा पद्धतीने DELIVER करतात. लेक्चर्स रूम्स भव्य आणि सुसज्ज आहेतच पण त्याहीपेक्षा मोठी आहेत ती प्रोफेसर्स ची मने. त्याचे असे झाले: पहिल्याच दिवशी लेक्चर चालू असताना मला SLIDES मधील काही गोष्टी खटकल्या. माझे मुद्दे नम्रपणे मांडून झाल्यावर प्रोफेसर चक्क "कदाचित माझे चुकले असेल, मी पुन्हा VERIFY करतो" असे म्हणाले. इतर कोणीही प्रश्न विचारले किंवा अगदी वाद जरी घातला तरीही प्रोफेसर्सना तो आवडतो, ते विद्यार्थ्यांना वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतात. दीड तासाच्या लेक्चर मध्ये पाऊण तासानंतर एक ब्रेक असतो , ब्रेक मध्ये प्रोफेसर अनौपचारिक गप्पा सुद्धा मारतात. आम्ही (वर्गमित्र आणि मी ) एकदा शंका विचारायला म्हणून ब्रेक मध्ये गेलो तर उत्तर दिल्यानंतर प्रोफेसर नी चक्क आम्हाला डोळा मारला (!!!). आमची बघण्यात चूक झाली असेल म्हणून आम्ही गप्प बसलो. पण नंतर अनेक दिवस आम्ही निरीक्षण केल्यावर असे लक्षात आले की सर्वच प्रोफेसर्स अधून-मधून डोळे मारत असतात (!). एका डच विद्यार्थ्याने कधीतरी विचारल्यावर खुलासा केला: जेव्हा डच माणूस INFORMAL बोलत असतो, तेव्हा तो अधून-मधून डोळे मारतो. अनेकदा प्रश्नाचे उत्तर सांगितल्यावर समोरच्या माणसाला ते पटले आहे का, हे विचारण्यासाठी सुद्धा डोळा मारण्याची पद्धत आहे.
हे ऐकून आम्ही फक्त "ओके"! म्हणालो.


कधीही युनिवर्सिटी मध्ये गेलो, आणि एखादा उपक्रम चालू नाही असे होते नाही. सतत काही ना काही चालू असते. एखादी डान्सची स्पर्धा , मुखवटे बनवण्याची स्पर्धा किंवा कसले तरी सेमिनार्स, कल्चरल इवेन्ट्स! एकदा उत्साहाच्या भरात विचारायला गेलो होतो: तर समजले अशा स्पर्धांमध्ये त्या त्या कला शाखेची मुले सहभाग घेतात आणि त्यासाठी त्यांनी  अनेक महिने मेहनत घेतलेली असते. यातली एक गोष्ट खूप घेण्यासारखी वाटली: कुठलाही कोर्स हा त्या विषयाचे सखोल ज्ञान देण्यासाठी विचारपूर्वक design केल्याचे जाणवते. जसे की डान्स आवडणारा मुलगा लहानपणापासून डान्स शिकू शकतो आणि त्यातच सर्व प्रकारचे advanced कोर्सेस सुद्धा करू शकतो. प्रत्येक कोर्स design  करताना विद्यार्थ्यांना इतर गोष्टी करण्यासाठी कमीत कमी वेळ मिळाला पाहिजे याची काळजी घेतलेली आहे. याचा फायदा म्हणजे : जे शिकतो आहे ते व्यवस्थित शिकता येते; पण मला होत असलेला मोठा तोटा म्हणजे : अभ्यासाबरोबर फक्त अभ्यास च करावा लागत आहे. इतर गोष्टी करण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो.
एकदा एका व्हायोलीन च्या मैफलीमध्ये १० मिनिटे रमलो , एका तलावाकाठी बदके न्याहाळत काही क्षण घालवले , महिन्यातून दोन वेळा क्रिकेट खेळलो आणि कधीतरी सायकल वर लांबपर्यंत चक्कर मारली. आता ती व्हायोलीन ची संथ सुरावट, सायकल वरून फिरताना दिसलेली नितांत सुंदर हिरवी दृश्ये आणि पाण्यात बेमालूमपणे मिसळून गेलेली हिरवी जमीन मनात घर करू पाहत आहेत...

Sunday, September 2, 2012

सायकलसाठी दाही दिशा....


२५ आणि २६ ऑगस्ट २०१२

२५ ऑगस्ट हा दिवस BIKE साठी शहरात जाण्याचा होता. WATERLOOPLEIN नावाच्या ठिकाणी शनिवारी बाजार भरतो असे ऐकले होते, तिथे 2nd HAND गोष्टी बऱ्या भावात मिळतात असेही सांगण्यात आले होते.. सार्वजनिक वाहतुकीसाठी देशभरात OV चीप कार्ड वापरतात. त्याचे क्लिष्ट असे मशीन समजून घेतले.
OV chip card machine @ Uilenstede tram/metro station


सुदैवाने इंग्रजी चा OPTION असल्याने फारसा त्रास पडला नाही. WATERLOOPLEIN  येथे जाण्यासाठी प्रथम आम्ही अॅमस्टरडॅमच्या स्वारगेटला म्हणजे "सेन्ट्रल स्टेशन" ला आलो. शहर फारच सुंदर असल्याने प्रत्येक चौकात TOURIST SPOT आहे असेच आम्हाला वाटत होते.

A typical view in Amsterdam

 WATERLOOPLEIN ला  भरलेला बाजार थेट जुन्या बाजाराची आठवण करून देणारा होता. तेथे सायकली सुद्धा बऱ्याच होत्या. किंमती उतरलेल्या असल्या तरीही सायकली आमच्या पसंतीस उतरल्या नाहीत. लंच साठी एका इटालियन हॉटेल मध्ये गेलो. तिथला पास्ता म्हणजे नूडल्स होते आणि पिझ्झा म्हणजे चीज पराठा ! चविष्ट असल्याने तक्रारीला जागा नव्हती. हॉटेल च्या छताला वाईनच्या बाटल्यांनी सजवले होते. ४-५ बाटल्यांचा गुच्छ करून त्यांना वेताने गुंडाळून आकर्षक पद्धतीने लटकवले होते.
An interesting ceiling in restaurant, Amsterdam


परत घरी येताना एका INDIAN SHOP बाबतीत कळले. ते घरापासून जवळच होते. "मसाला एक्स्प्रेस" असे त्याचे नाव ! जिवात-जीव आला. तेथे तांदूळ, मसाले, डाळ वगैरे खरेदी झाली. आजूबाजूच्या रमणीय परिसरात फोटोग्राफी झाली. चित्रात विचार करून काढावा तसा हिरव्यागार गवतातून घराकडे जाणारा रस्ता , त्याला नागमोडी वळण , वळणावर डेरेदार झाड ! तिथे राहणाऱ्या लोकांचा क्षणभर हेवा वाटला.  कौस्तुभाच्या रूमवर सर्व जमलो. रसगुल्ला पार्टी झाली. आणि सायकल न मिळून सुद्धा दिवसाचा शेवट गोड झाला.

A beautiful neighborhood in Amstelveen

२६ ऑगस्टच्या  रविवारी मात्र सायकल घ्यायचीच असा चंग बांधून आम्ही रूम्स सोडल्या..
स्टेशन RAI या ठिकाणी सायकल घेण्यासाठी निघालो. सकाळच्या वेळेस कॅनाल्सचे सौंदर्य काही औरच होते. एका बोटचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा बोटमनने बोट थांबवली आणि हात केला! (आमच्या मनातले ओळखले , म्हणून आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला.) 
A boat in a canal, Amsterdam

दुर्दैवाने RAI स्टेशनच्या जवळील सायकल्सचे दुकान बंद होते. कौस्तुभा व मी सायकलसाठी फारच आसुसलेलो असल्याने "आल्स्मीअर" या खेडेगावी निघालो. RAI स्टेशन हून HOOFDDROP येथे जाणारी ट्रेन पकडली. आमच्याकडे असलेले OV चीप कार्ड ट्रेन मध्ये सुद्धा चालेल अशा कल्पनेने आम्ही ते कार्ड SWIPE करून चेक इन केले... मात्र ट्रेन मध्ये वेगळे तिकीट सुद्धा घ्यावे लागते असे आत बसल्यावर कळले. विना-तिकीट प्रवास झाला. रविवार असल्याने बहुधा चेकर नव्हता. HOOFDDROP येथून १४० नंबरची बस करून "आल्स्मीअर" ला गेलो. तेथे OOSTEINDERWEG या रस्त्यावर २७७A या ठिकाणी आम्हाला जायचे होते. बसने आम्हाला घर क्रमांक १ पाशी उतरवले होते :( तेथून विषम क्रमांकाची घरे एका बाजूला , तर सम क्रमांकाची घरे एका बाजूला अशी रचना होती. बरीच पायपीट करावी लागणार हे दिसत होते. 

A beautiful house is Aalsmeer, Netherlands

सरळ असणारा तो रस्ता "कन्याकुमारी-रामेश्वर" रस्त्या सारखा वाटला. फक्त इथे आजूबाजूला सुंदर घरे होती. प्रत्येक घर आखीव-रेखीव , नवीन; कुणीही आपल्या शेजाऱ्याची नक्कल केली नव्हती... अगदी बागेतील झाडे, कटिंग, खिडकीतील सजावट सगळेच वेगळे... फोटो काढून दमलो. पारंपारिक डच घरे बघितली आणि त्यांची OPEN WINDOW संस्कृती थोडी समजली. नेदरलँडमध्ये सहसा खिडक्यांना पडदे लावत नाहीत, असतील तरीहि ते उघडे असतात. याची अनेक कारणे आहेत: पूर्वापारपासून प्रकाश घरात यावा म्हणून पडदे लावले जात नव्हते, बंदिस्त वाटू नये म्हणून आज-कालची डच लोकं पडदे लावत नाहीत. स्पष्ट वक्तेपण किंवा काहीही लपवून न ठेवण्याची वृत्ती सुद्धा या OPEN WINDOW CLUTURE मधून दिसते. बरीच डच मंडळी तर घरातील शोभेच्या सर्व वस्तू या खिडक्यांपाशी आणून ठेवतात. 

A Dutch house showing open window culture, Aalsmeer, Netherlands

 येणारे-जाणारे कुतूहलाने आत बघू लागले किंवा थांबून निरीक्षण करू लागले तर या डच लोकांना गप्पा मारायला सुद्धा खूप आवडतात. वाद घालण्यात डच लोक एक्स्पर्ट असतात. (DUTCH PEOPLE LOVE DEBATE ) असे ऐकले होते.
आम्ही कोणीही वाद घालेल असे वर्तन केले नाही. ४-५ किलोमीटर चा रस्ता तुडवला, तेव्हा २७७ A  घर आले. दोघांना सायकली मिळाल्या : ५० युरोमध्ये !
My 50 Euro bike !

इतक्या लांब आल्याचे सार्थक झाले.  परत जाताना जवळील हॉटेल मध्ये चीज सँडविच खाल्ले आणि घराच्या दिशेने निघालो. विचारत विचारत (आणि विचारात सुद्धा ) आऊलेन्स्तेद कुठे असेल याचा अंदाज घेत होतो. कुठल्याश्या जंगलामधून जाताना खूप भारी वाटले!
A bike trail through forest

सगळी माणसे रस्ता विचारल्यावर विचार करून दिशा-दर्शन करत होती. असल्यास नकाशा देत होती आणि त्यावर आत्ता कुठे आहोत आणि कसे जायचे हे पेनने दाखवत होती. डच लोकांची मदत करण्याची वृत्ती भावली.साधारण १५ किलोमीटर सायकलींग झाले. सांस्कृतिकरित्या डच व्हायला सुरवात झाली....
A bike trail in the city of Amsterdam, Netherlands

डच कल्चरचा तास



२४ ऑगस्ट २०१२

२४ ऑगस्ट ला डच भाषेचे लेक्चर ११:३० वाजता होते. नाश्त्याला उपीट बनवले होते, आईने रेडीमेड भाजून वगैरे रवा दिल्याने ते उत्तम झाले होते. आम्हाला मेन बिल्डींग च्या ठरलेल्या रूमला पोचायला ११:३२ झाले, रूम चे दार लावून घेण्यात आले होते. वेळ कसोशीने पाळणे आता यापुढे जरुरी होते. डच संस्कृती (CULTURE ) वरचे लेक्चर १:१५ वाजता दुसऱ्या एका (मेडिकल) बिल्डींग मध्ये होते. लेक्चर रूम सुसज्ज आणि भव्य होती. 

A lecture room @ VU, Amsterdam
DAVID BOS नावाच्या प्रोफेसरने DUTCH CULTURE छान उलगडून सांगितले: 
सायकल ही नेदरलँड ची संस्कृती आहे. तेथील सायकलींचे मोठे प्रमाण असण्याचे कारण सपाट जमीन तसेच सपाट सामाजिक स्तर हे सुद्धा आहे. नेदरलँडमध्ये पूर्वीपासून जातीभेद अतिशय कमी होता. जुनी तैलचित्रे पहिली असता त्यातील लोकं एकाच उंचीची दाखवलेली असतात. (कारण : सम-भाव) अनेक राण्या सायकलने राज्यात फिरत असत. साहजिकच जनता सायकल वापरण्यास प्राधान्य देत.सध्या मात्र सायकल वापरणे ही गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असली तरीहि ती महाग आहे आणि शिवाय सायकलने आपण देशात सगळीकडे फिरू शकतो. बस/ट्राम या सगळीकडे जाऊ शकत नाहीत.
देशाचा झेंडा लाल, पांढरा व निळा असताना नारिंगी रंगाचे डच लोकांना एवढे आकर्षण का याचे उत्तर सुद्धा मिळाले: WILLIAM OF ORANGE नावाच्या माणसाला डच लोक फार मानतात. १६४८ साली स्पेन विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य-लढ्यामध्ये तो एक महत्वाचा नेता होता. त्याच्यामुळे हा देश स्वतंत्र पणे अस्तित्वात येऊ शकला. म्हणून आज आपण नारिंगी किंवा ORANGE हा रंग नेदरलँड चा रंग म्हणून ओळखतो. 
लेक्चर नंतर पुन्हा UNIVERSITY ची बिल्डींग "समजून घेण्यास" निघालो. UNIVERSITY ची इमारत प्रेक्षणीय होतीच. 
Medical building of the VU, Amsterdam 

सायकलचे पार्किंग इतर गाड्यांच्या पार्किंग पेक्षा मोठे होते :) (आणि ते पूर्ण भरलेले होते ). SCIENCE FACULTY चीइमारत ही नेदरलँडमधील सर्वांत लांब इमारत आहे. तीत A -  Z अशा २६ WINGS आहेत. आणि प्रत्येक WING मध्ये २०-३० रूम्स!  बास्केटबाॅल, व्हॉलीबाॅल ची कोर्टस,लाल विटांनी बांधलेली मेडिकल FACULTY ची इमारत या गोष्टी WEB SITE वर दाखवल्या तशाच होत्या. :) गुळगुळीत दगडांनी बांधलेले टेबल टेनिस चे टेबल विशेष आवडून गेले. मुख्य इमारत आणि शास्त्र शाखेची इमारत दोन्ही ठिकाणी युरोपिअन पदार्थांची रेलचेल असलेली उपहारगृहे आहेत. तेथील पद्धत सुद्धा खास होती: प्रथम प्लेट्स घ्यायच्या (स्वतः), सगळीकडे हिंडून पदार्थ वाढून घ्यायचे आणि ते भरलेले ताट घेऊन नाचवत COUNTER वर जायचे , आणि पैसे भरून ते ताट पोटात रिचवण्यासाठी बाहेर घेऊन जायचे!  बास्केटबाॅल कोर्ट च्या समोर मोकळ्या जागेत बेंचेस टाकले होते सर्व देशांचे विद्यार्थी तेथे एकत्र जेवतात. एकत्र चर्चा करतात. प्रोफेसर्स सुद्धा विद्यार्थ्याच्या बरोबर बसून सँडविचवगैरे खात मार्गदर्शन करतात. ते पाहून एक आंतर-राष्ट्रीय जाणीव होते आणि काहीतरी करण्याची उर्मी मिळते.

स्पोर्ट्स डे आणि डच डिनर


२३ ऑगस्ट २०१२

२३ तारखेला कॅम्पस टूर आयोजित केली होती. काल भेटलेला "कौस्तुभा" (कौस्तुभ नव्हे), आणि माझ्याच कोर्स ला बरोबर असलेले शरण, रोशन, व मानसा असे एकत्र UNIVERSITY  मध्ये गेलो. कॅम्पस टूर अपेक्षेपेक्षा कमी वेळात संपली. ESN ची जी मुलगी आमच्याबरोबर गाईड म्हणून आली होती, तिला घरी जायची खूपच घाई होती, तिने फटाफट बिल्डींग्स ची नावे सांगून आम्हाला कटवले. आऊलेन्स्तेद ला SPORTS DAY असल्याने आम्ही फारशी कुरकुर न करता परत गेलो. मी FITNESS साठी नाव नोन्दवले असल्याने जिममध्ये जाऊन व्यायाम केला, बाकी मंडळींनी बास्केटबाॅल, फूटबाॅल, बॉक्सिंग वगैरे मध्ये भाग घेतला होता.
VU Sport center, Uilenstede, Amstelveen


सहा वाजता डच डिनर होता, त्या अगोदर BANNER COMPETITION चा निकाल घोषित झाला. मी त्यात भाग घेतला होता. VU UNIVERSITY चा BANNER घेऊन स्वतःचा फोटो UPLOAD करायचा होता. मी मारुतीचा छाती फाडून राम-सीता दाखवणारा फोटो एडीट केला होता. मारुतीच्या चेहऱ्या ऐवजी माझा चेहरा आणि छातीमध्ये रामा-ऐवजी BANNER ! माझ्या दृष्टीने हा फोटो बराच CREATIVE होता, मात्र ग्लोबल अपील फारसे नव्हते. या स्पर्धेत रशियाची का कोरिया ची एक मुलगी जिंकली, जिने विविध देशाच्या झेंड्यांच्या बरोबर BANNER चा फोटो हातात घेऊन UPLOAD केला होता. स्पोर्ट सेंटर च्या समोरील हिरवळीवर FLYING DISH ने टिनचे CANS उडवण्याचा खेळ चालू होता. वीसेक वेळा प्रयत्न केल्यावर ते एकदा जमले ! FLYING DISH एकदा तळ्यात पडली. हे तळे मला आल्या-दिवसापासून भावले होते. 
A pond in the Uilenstede Campus


त्यात हात ओले केले ; मात्र DISH पाण्यात दूर होती. थोडा वेळ प्रयत्न करून आम्ही तिचा नाद सोडून दिला.  "औका" नावाचा एक डच मुलगा सुद्धा FLYING आमच्याबरोबर DISH खेळत होता. खेळून झाल्यावर त्याचा फोन नंबर मागितला तर तो चक्क नाही म्हणाला. म्हणे- रात्री पार्टी ला जाऊ, बियर पिऊ. थेट भेटू. "आमचं कल्चर असंच आहे".. वा रे कल्चर मजा करायला कंपनी हवी, गरज लागली तर संपर्कासाठी मात्र फोन नंबर नको! एक मात्र नक्की- डच लोक जे आहे ते तोंडावर बोलतात. एकदम FRANKLY ..
संध्याकाळी डिनर होता. डच डिनर बाबतीत ऐकलेली वदंता बरीच खरी निघाली: "डच डिनर ब्रेड पाशी सुरु होतो आणि बटर पाशी संपतो". एक अतिशय बेचव असे पावात गुंडाळलेले सलाड , सूप, आणि ब्राऊनी असा आमचा डिनर होता. जॉर्जिया , एमा (दोघी ग्रीस), व आम्ही ५ भारतीय , आम्ही एकत्र जेवलो.

Chilling on the lawn @ Uilenstede (from left:  Roshan, Manasa, Sharan, Georgia, Unmesh, Emma)

 स्पोर्ट सेंटर च्या समोरच्या हिरवळीवर जणू छोटे जगच अवतरले होते. जवळपास ५० विविध देशांचे मुलं-मुली शिकायला VRIJE मध्ये आले होते (VRIJE चा उच्चार डच मध्ये  "फ्राय" असा करतात). डिनर नंतर GRIFFIOEN कॅफे मध्ये नाटके व तत्सम ACTIVITIES  चौकशी केली. डच येणे अनिवार्य आहे असे समजले (आता डच शिकायला सुरवात करायलाच हवी). तेथे टिपिकल डच कॉफी (म्हणजे प्रचंड कडू पण चविष्ट ) पिऊन सूर्यास्त पाहण्यासाठी निघालो (९.०० वाजता) ढग खूप असल्याने तो बेत फसला. हा दिवस जरा HAPPENING  गेला होता खरा! 
Drinks @ VU sport center lobby with Manasa, Roshan and Koustubha


पहिला नारिंगी दिवस: नवीन रस्ते, नवीन खेळ, नवा गडी, नवं राज्य


२२ ऑगस्ट २०१२

अॅमस्टरडॅम मधील पहिला दिवस उशिराच उगवला. (म्हणजे मी उशीरा उठलो).इथली  सूर्याची किरणे फारशी काही वेगळी नव्हती , ऊन सुद्धा तेच होते. आकाश तेच.. झाडे मात्र युरोपिअन!
View from the Balcony of Uilenstede 16/85, Amstelveen


आल्यापासून प्रकर्षाने जाणवलेली  आणि (बोचलेली ) गोष्ट म्हणजे इथला वारा.. इथे झुळूक नावाचा प्रकार नाहीये. वारा वाहतो म्हणजे अंगात घुसायचा प्रयत्न करतो. माझ्या रूमला बाल्कनी आहे , तिचे दार उघडताच थंडगार वारा आत येतो आणिअवघी रूम गारठवतो २२ तारखेला GRAND ओपनिंग आणि BIKE SALE होता. ११ वाजता BIKE SALE साठी जायचे होते. BIKE म्हणजे आपली सायकल! इथे तिला BIKE म्हणतात!  जुलिया , जॉर्जिया व मी असे एकत्र निघालो. "आऊलेन्स्तेद" चा कॅम्पस तसा मोठा आहे. झाडे व लॉन यांची रचना कॅनॉल्स ला विचारात घेऊन केली आहे. कॅनोल्स वर बांधलेले पूल परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात.

A canal near the Uilenstede campus, Amstelveen

 सायकली खूप महाग असल्याने कुणीच घेतल्या नाहीत . झीग्गो नावाच्या INTERNET PROVIDER OFFICE मध्ये गेलो आणि रूममधील INTERNET विषयी माहिती घेतली. यानंतर UNIVERSITY मध्ये काम असल्याने मी व जुलिया मेन बिल्डींग कडे निघालो. दहा मिनिटांचा रस्ता असल्याने चालतच निघालो होतो. (TRAM / METRO ) चे स्टेशन मात्र झकास होते. रस्ता  सुरेख होताच. इथे वाहने उजव्या बाजूने जातात. रस्त्याच्या सर्वांत उजवी बाजू चालणाऱ्या लोकांसाठी , त्यानंतर एक लाल रंगाची लेन सायकलींसाठी, व नंतर कार्स साठीची लेन; अशी व्यवस्था होती. रस्त्यावर चालताना सिग्नलचे भान ठेवावे लागत होते. इथे पादचाऱ्यांना सुद्धा सिग्नल असतो (आणि तो सगळे पाळतात). UNIVERSITY ची मेन बिल्डींग भव्य आणि भुरळ घालणारी आहे.
Main building, Vrije University, Amsterdam

१ वाजता UNIVERSITY च्या PRESIDENT चे अभिभाषण (ADDRESS ) होते. त्यासाठी AULA AUDITORIUM मध्ये गेलो. मि.स्मिथ यांनी दिलेल्या भाषणात (BE CURIOUS )!"उत्सुक राहा" हा संदेश होता. अॅमस्टरडॅम मध्ये तो अर्थातच लागू होतो  :)  नंतर GREG SHAPIRO  या अमेरिकन विनोदवीराने आमचे मनोरंजन केले. " HOW TO BE DUTCH " या विषयावरच्या त्याच्या प्रेझेन्टेशन ला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डच स्पेलिंग्स , डच EXPRESSIONS यांवर टिप्पणी करत त्याने ज्ञानात बरीच भर घातली.
घरी परतलो तर सकाळी सुरु झालेले इवेन्ट्स अजून सुरूच होते. इथल्या VBU नावाच्या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमा-अंतर्गत  विविध गेम्स चालू होते. आर्चेरी, टिकर , DIVING यांचा आनंद लुटला.


 तेथेच कॉफी प्यायली. अॅमस्टरडॅम च्या पार्टी कल्चरशी तोंड-ओळख झाली. ओळख नसताना सुद्धा तुम्ही इथे इतरांचे मित्र(!) होऊ शकता. जाता - येता कितीतरी जण तुम्हाला हाय-हॅलो करतील. तुमच्याकडे बघून हसतील (म्हणजे SMILE देतील). तुम्हाला छान वाटेल.  दुसऱ्याच क्षणी तुम्ही हसणाऱ्या व्यक्तीकडे पहाल तर ते खोटे हसू लुप्त झालेले असेल आणि कट्टर व्यावसायिक चेहरा दिसेल. विमानतळावर घ्यायला आलेली डच बाई, DUWO या संस्थेची सर्व डच मंडळी खूपच मैत्रीपूर्ण भावनेने वागत होते. याचे कारण त्यांचा व्यावसायिक फायदा ! "डच लोक फ्रेंडली असतात" अशा ऐकीव गोष्टीवर लगेच भरवसा ठेवायला मी तयार नव्हतो. फ्रेंडली असायला कुठल्याच देशाचे नागरिक असणे आवश्यक नसते.  अजून दोन वर्ष आहेत डच लोकांना  ओळखायला .....

Wednesday, August 29, 2012

मदर इंडिया ते नेदरलँड

२०, २१ ऑगस्ट २०१२ :

११  जुलै ला विसा मिळाला आणि मी AMSTERDAM ला MS  करायला जाणार हे निश्चित झाले. झाले! तयारी राहिली बाजूला, भेटीगाठी , गेट टूगेदर यांना ऊत आला.  शेवटच्या क्षणापर्यंत सामानाचे वजन करून सुटकेस भरणे चालू होते. २० तारखेच्या सोमवारी रात्री अकरा वाजता फ्लाईट होती. गाडीत बरोबर प्रणव (सख्खा भाऊ) , आई, दोन काकू, आत्या अशी मंडळी  होती. घरातून निघताना दादांचे (आजोबा) पाणावलेले डोळे बघवत नव्हते. आबा काका, वैभव, शेखर काका , आणि पंकज व सागर (BEST FRIENDS ), नंदादीप सोसायटी , सिंहगड रोड , पुणे आणि पुण्याचे पाणी , पुण्याची माती  यांना निरोप देणे तितकेच अवघड होते. चेहरा शक्य तितका  निर्विकार ठेवून घरातून बाहेर पडलो.  भर दुपारी एक वाजता सुद्धा ढगाळ वातावरण होते. आम्ही जात असलेली तवेरा गाडी उगाच भरभर जात आहे असा भास होत होता. ५ वाजता आम्ही विमानतळावर पोचलो सुद्धा ! प्रवासात काकू-आत्या आणि आई यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकणे आणि सतत येत असणाऱ्या फोन्सना प्रतिसाद देणे हाच उद्योग होता. प्रसाद (सख्खा चुलत भाऊ)  आणि मामा थेट मुंबई विमानतळावर निरोप द्यायला आलेहोते. ११ ची फ्लाईट असली तरी चेक-इन "शक्य तितके लवकर कर" या सल्ल्यामुळे साडेसहा वाजताच मी मुख्य दाराकडे निघालो. ट्रॉली वर दोन बॅग्स ठेवून वर केबिन बॅग आणि शिवाय जर्किन असे सामान बरोबर होते. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मागे वळून पाहण्याचे धाडस मी केले नाही. आईचा बांध नक्कीच  कोसळला असता. तिने कालपासून एकदा सुद्धा डोळ्यात पाणी येऊ न देऊन खूप मोठा मानसिक आधार दिला होता.  सुदैवाने CRYING CEREMONY घडला नाही. ७ वाजता चेक इन सुरु होणार आहे असे कळले; मुंबई विमानतळावर सगळा मराठी स्टाफ आहे असे कोणीतरी सांगितल्याचे आठवले. मी मराठीतूनच चौकशी करून माझी ओळ कुठली व माझी सामानाची तपासणी कोण करणार आहे इत्यादी माहिती करून घेतली.
इस्राईल एयरलाईनची तपासणी म्हणजे एक भयानक अनुभव होता: त्या माणसाने मला अतिरेकी समजून प्रश्न विचारायला सुरवात केली. "TELL ME ABOUT YOURSELF " या प्रश्नाने तर मी उडालोच. (हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो ). नंतर मी त्याला माझा संपूर्ण बायो-डाटा सांगितला तेव्हा कुठे तो शांत झाला. दोन्ही  बॅग्सची कसून तपासणी झाल्यावर मी त्या बॅग्स प्लास्टिकने गुंडाळण्यासाठी गेलो. ते मशीन (ज्याला मी श्री-कृष्ण मशीन नाव दिले ) पाहून द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा  राहिला. दुर्योधन द्रौपदीचे वस्त्र-हरण करत असताना कृष्ण ज्याप्रमाणे हातातून वस्त्र देऊन द्रौपदी चे लज्जा-रक्षण करत असतो ,तद्वत त्या मशीन मधून प्लास्टिक बाहेर येत होते व बॅगला गुंडाळले जात होते.  चेक इन झाल्यावर "आप्रवासन" (IMMIGRATION) कडे निघालो. त्याचा FORM भरून सुरक्षा तपासणी साठी रांगेत उभा राहिलो. ब्लेझर वगळता काही कपडे काढावे लागले नाहीत हे नशीबच! या सगळ्या दिव्यातून  पार पडल्यानंतर DUTY FREE शॉप्स च्या मोठ्ठ्या मॉल सारख्या भासणाऱ्या जागेत आलो. येथून सर्व सुटणाऱ्या  विमानांचे प्रवेश असतात. आणि जोपर्यंत BOARD करायला सांगत नाहीत तोपर्यंत तुम्हाला BORE व्हावे लागते. त्यातून मी एकटा होतो. विद्यार्थी भासणाऱ्या दोघांना मी हेरले: प्रतिक आणि देवेश(पुणेकर)!  मीहून बोलायला सुरवात केली. मग मैत्री व्हायला वेळ लागला नाही. एकत्र जेवण, फिरणे , फोटो काढणे यांत वेळ घालवला. ते दोघे आणि इतर अजून ७ जण न्यूयॉर्क ला BRINGHAMTON ला MS करायला चालले होते. तेल-अवीव पर्यंत माझ्या-बरोबर असणार होते हा एक मोठाच दिलासा होता. ११ वाजता बोर्डिंग सुरु झाले. आणि आमच्या नकळत आम्ही विमानात प्रवेश केला. माझा पहिलाच विमान-प्रवास असल्याने थोडी धाकधूक होती. टेक ऑफ ला काहीतरी होईल असे उगाच वाटत होते; पण साधा पोटात गोळा सुद्धा आला नाही. थ्रिलिंग वगैरे काहीच वाटले नाही. त्यातून बाहेर अंधार असल्याने काही बघायची सोय नव्हती. आतमध्ये मात्र हवाई-सुंदरी या नावाला जागतील आणि (खरंच रात्रभर पाणी- लोणी विचारण्यासाठी जागतील ) अशा होस्टेस होत्या :)  खिडकी जवळची जागा असल्याने निदान डोके टेकून झोपायचा प्रयत्न केला; मात्र पाय ताणून न देता आल्याने झोप आली नाही. वेळ घालवण्यासाठी जे येईल ते खात-पीत होतो. (फक्त शाकाहारी असल्याची खात्री करून ) इतका निवांत वेळ खूप दिवसांनी मिळाला होता. एक कविता झाली :" सोडून जाताना देश माझा.." शेजारी मुंबईचाच  RELIANCE मधला एक अनुभवी माणूस बसला होता. तो इस्राईल ला कामानिमित्त चालला होता. त्याने गप्पा मारून वेळ घालवण्यास थोडी मदत केली. माझ्या घड्याळात सहा वाजून गेले होते. AMSTERDAM ची फ्लाईट स६:१५ ची असल्याने मला काळजी वाटू लागली. पण शेजाऱ्याने ६:१५ हे तेल अवीव च्या वेळेनुसार असल्याचे सांगितले आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तिकीटा वरची वेळ ही त्या त्या देशानुसार असू शकते हे माझ्या लक्षात आले नव्हते.

पाचच्या  (इस्राईल च्या वेळेनुसार) सुमारास तेल अवीव ला पोचलो. ते विमानतळ कल्पनेहून अधिक सुंदर होते पण सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी वेळ नव्हता. माझी पुढील फ्लाईट ६:१५ ला होती. त्यासाठी TRANSIT VISA चे गेट शोधून माझ्या टर्मिनल पाशी जाऊन थांबलो. विमानतळावरील WI - FI  चा उपयोग करून मेसेज पाठवले. पावणे सहा वाजता बोर्डिंग झाले. पहाटेची वेळ, त्यातून आजूबाजूला असलेले विकसित केलेले नैसर्गिक (!) सौंदर्य. आंघोळ न करता सुद्धा ताजेतवाने वाटले. या विमान प्रवासात बरोबर कोणीही विद्यार्थी नव्हता. समोर चालू असलेला पिक्चर (हिमगौरी आणि सात बुटके या गोष्टीचा) बघण्यात वेळ घालवला. खिडकीची जागा असल्याने युरोपचे विहंगम (शब्दशः)  घडत होते. भूगोल कच्चा असल्याने देश व बेटे ओळखता येत नव्हती. पण जे काही होते ते नितांत सुंदर होते. ११ वाजता (नेदरलँड च्या वेळेप्रमाणे) AMSTERDAM ला पोचलो. मी करण्याआधी प्रणव चाच फोन आला. त्याला खुशाली कळवली. ARRIVALS पाशी जाऊन माझे सामान ताब्यात घेतले. WI - FI चा वापर करून FACEBOOK आणि GMAIL वर स्टेटस UPDATE  केले. UNIVERSITY ची बस घ्यायला येणार असल्याने त्यांना भारतातला IDEA चा नंबर दिला होता. स्किपहोल विमानतळा-बाहेर पडून कुठे बस दिसते का याचा शोध घेतला. LYCA मोबाईल चे कार्ड घेऊन UNIVERSITY ला फोन केला. त्यांनी ESN (ERASMUS STUDENT NETWORK ) च्या लोकांना शोधा असे सांगितले. एका भल्या डच माणसाने मला विमानतळावरील MEETING POINT दाखवला. सुदैवाने  तेथे ESN चे लोक सापडले. एका डच मुलीने स्वागत केले आणि नाव वगैरे विचारून मला थांबायला सांगितले. १२ ची बस चुकली होती. २ च्या बसला अवकाश होता. मी बिस्किटे खाऊन भूक भागवली. घरी फोन केला. माझ्या पाठोपाठ मारिया, जुलिया, अनाडा, जॉर्जिया , वगैरे परदेशी मुली VRIJE ला जाण्यासाठी MEETING POINT ला आल्या. (वेळ चांगला गेला हे सांगायला नकोच.) "आऊलेन्स्ताद" (UILENSTEDE) हे आमचे राहण्याचे ठिकाण ! तेथे बसने जाण्यास १५ मिनिटे लागली. पोचताच अनेक कागदी घोडे नाचवणे जरुरी होते: तिथल्या नगरपालिकेत नाव-नोंदणी, बँक खाते उघडणे, DUWO (घरे भाडे-तत्वावर देणारी संस्था) यांचे CONTRACT SIGN करणे  , RESIDENCE PERMIT  घेणे, ESN चे कार्ड घेणे.... हे सगळे करेपर्यंत ६ वाजून गेले आणि दमून गेलो. जुलिया आणि जॉर्जिया बरोबर असल्याने (निदान कोणीतरी बरोबर असल्याने) थोडा उत्साह शिल्लक होता. रूम्स च्या चाव्या घेऊन रूम गाठली. ७ वा मजला ! एंथनी नावाच्या मुलाने मला लिफ्ट पर्यंत सामान नेण्यास मदत केली.  हुश्श झाले.  सामान लावेपर्यंत ९ वाजले. तरी बाहेर ऊन होते पण आता जेवायला हवेच होते. आईने दिलेले पराठे गरम करून खाल्ले. माझ्या शेजारीच निशांत नावाचा भारतीय भेटला; त्याच्या रूम मध्ये सौरभ नावाचा जळगाव चा मुलगा थोडे दिवस राहायला आला होता. त्यांना भेटून बरे वाटले. शांत झोप लागली.