Sunday, May 28, 2017

डच लग्न : एक रेखीव सोहळा


२१ एप्रिल २०१७: येरुन आणि ह्योजिन


२०१२-२०१४ दरम्यान अॅमस्टरडॅममध्ये शिकत असताना दोन डच सहाध्यायी खूप चांगले मित्र बनले:  नाथन आणि येरुन.   जून २०१६ मध्ये त्यापैकी येरुनची ईमेल आली. त्याच्या लग्नाचे निमंत्रण! तो आणि त्याची गर्लफ्रेंड ह्योजिन ९ वर्षे एकत्र होते त्यामुळे लग्नाचे निमंत्रण हा धक्का नव्हता, पण एक सुखद बातमी होती.  

आमंत्रणाचा स्वीकार अथवा नकार लिहून कळवणे  आवश्यक होते, जेणेकरून लग्नाच्या दिवसाचा माणशी बेत आखणे सोईचे होईल.  येरुन चा मित्र यियू, ज्याला प्रमुख संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्याला येणार म्हणून कळवले.  त्यानंतर प्रत्येकाच्या घरी पत्रिका पाठवण्यासाठी पत्ते मागवण्यात आले. "आधी ईमेल मग मेल" अशा क्रमाने दोन निमंत्रण पत्रिका आल्या.
लग्नाच्या दिवशीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे होता :
१. "लायडेन" च्या वनस्पती उद्यानात एका मोठ्ठ्या हॉल मध्ये एक छोटेखानी समारंभ
२. उद्यानात पेयपान आणि अल्पोपहार
३. ट्युलिपच्या एका शेतात फोटोशूट
४. "नॉर्डवाईक" येथील समुद्र किनारी असलेल्या हॉटेल मध्ये जेवण

लग्नाच्या आधीच आहेरासाठी इच्छा सूची करण्यात आली होती, तीत नवरा-बायको ला आहेर म्हणून कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या लिहील्या होत्या. शिवाय ऑनलाईन निनावी पैसे देण्यासाठी यियू चा बँक अकाउंट नंबर देण्यात आला होता. आहेर देणे शक्य नसेल तरीहि लग्नाला आलेच पाहिजे असे पत्रिकेवर खास लिहीले होते.

माझा मित्र नाथन आणि मी अॅमस्टरडॅम दक्षिण स्थानकापासून दुपारी १ वाजता निघालो. दोन च्या सुमारास "लायडेन" या छोट्या शहरात असलेल्या बोटॅनिकल गार्डन मध्ये पोचलो. बरेच ओळखीचे चेहरे दिसले. येरुन आणि माझे  कॉमन मित्र-मैत्रिणी.   येरुन च्या आई वडिलांनी आमचे स्वागत केले. लग्नासाठी सर्व पुरुष सूटबूट आणि बायका वैविध्यपूर्ण ड्रेस परिधान करून आले होते.  अंदाजे ५०-६० लोक होते.

Bas, his gf, Josh and I 


लग्न लावण्यासाठी लग्न नोंदणी कार्यालयातील एक स्त्री-अधिकारी होती. तिने येरुनने पाहुण्यांना उद्देशून लिहून दिलेले एक पत्र आणि ह्योजिनने पाहुण्यांना उद्देशून लिहून दिलेले एक पत्र वाचून दाखवले. त्यामध्ये त्यांनी त्यांची भेट कशी झाली, प्रेम कसे जमले आणि बहरले, एकमेकांचे छंद, यांचे वर्णन केले होते. तसेच कठीण प्रसंगी कशी एकमेकांना साथ दिली आणि उपस्थित पाहुण्यांची त्यांच्या नात्याला कशी मदत झाले याचे आभारपूर्ण विवेचन केले होते.

Jeroen and Hyojin in the Botanical garden


कार्यक्रमाचा संयोजक यियू याने वधूकडील मंडळी कोरियन असल्यामुळे दुभाष्याची भूमिका सुद्धा पार पाडली. येरुन चा खास दोस्त रेमको हा  त्याचा "बेस्ट मॅन"  होता (म्हणजे "करवला"), त्याच्याकडे लग्नाची अंगठी होती. ती येरुन ला देण्याचे (फक्त) काम त्याच्याकडे होते. नवल म्हणजे नवरा- नवरी किंवा त्यांचे आई-बाबा यांपैकी कोणीच पूर्ण समारंभात बोलले नाही. फक्त नोंदणी अधिकाऱ्याचे भाषण झाले. येरुन-ह्योजिन यांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. रेमको आणि ह्योजिन चा भाऊ यांच्या साक्षीदार म्हणून सह्या झाल्या. येरुन-ह्योजिन  यांना पती-पत्नी म्हणून घोषित करण्यात आले. पती-पत्नी म्हणून प्रथमच येरुन आणि ह्योजिन यांनी पाहुण्यांच्या साक्षीने चुंबन घेतले. टाळ्यांच्या कडकडाटात वधू -वर हॉल च्या बाहेर पडले.

Wedding cakes


रिसेप्शन हॉल मध्ये शॅम्पेन आणि इतर पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय वेडिंग केक सुद्धा एका टेबल वर सजवून ठेवला होता. सोबत अल्पोपहाराचे पदार्थ घेऊन वेट्रेसेस फिरत होत्या. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येरुन आणि ह्योजिन हॉल मधील एका टेबल पाशी उभे राहिले, आणि केक खाऊन गोड झालेल्या तोंडाने सर्वांनी त्यांना तोंड भरून गोड आशीर्वाद दिले (आणि आहेर सुद्धा) पैकी काही भेटी येरुन आणि ह्योजिन ने लगेच उघडून पाहुण्यांचे आभार मानले.

साडे चार च्या सुमारास सर्व पाहुण्यांना ट्युलिप च्या शेतात नेण्यासाठी बस ची सोय केली होती.  अनेक कोरियन पाहुणे असल्यामुळे त्यांना ट्युलिपची शेते  बघण्याची खूपच उत्सुकता होती.  एका शेतकऱ्याचे शेत २ तासांसाठी भाड्याने घेतले होते. फोटो सेशन चे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे कॅमेरा घेऊन उडणारे ड्रोन.  येरुन च्या एका मित्राने ते विमान कलात्मकतेने उडवून उपस्थितांची मने जिंकली. व्यावसायिक छायाचित्रकार बरोबर असल्याने फोटोशूट मस्त झाले.  रंगीत ट्युलिप च्या पार्श्वभूमीवर नवविवाहीत प्रसन्न जोडपे आणि त्यांचे  आनंदी  पाहुणे !

Jeroen and his family with Hyojin in a Tulip field


शेकडो फोटो काढून झाल्यावर चहापान झाले. तेथे चहा-कॉफी आणि स्ट्रॉपवाफेल नावाची डच बिस्किटे अशी व्यवस्था शेताला लागून असलेल्या छोट्या प्रदर्शनीय हॉटेल मध्ये केली होती. येरुन ची आत्या आणि मामा- मामी अतिशय मनमोकळेपणाने बोलत होते, त्याचा चुलत भाऊ लाउरेन्स तोडक्या मोडक्या इंग्रजीत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.

सात च्या सुमारास बस मध्ये बसून आम्ही "नॉर्डवाईक" या गावाच्या बीच वर गेलो. तेथील हॉटेल मध्ये जेवणासाठी बुकिंग केले होते. लायडेन च्या हॉटेल मधील फुलांची सर्व सजावट येरुन ची बहीण कार ने घेऊन आली होती. ती सर्व सजावट (पुष्पगुच्छ आणि फुलदाण्या) त्या हॉटेल मध्ये लावण्यात आली.

येरुन ची एक मैत्रीण आणि मी दोघेच शाकाहारी असल्यामुळे आमच्यासाठी खास थाळी बनवण्यात आली होती. दुधी भोपळ्याचा पाय (vegetable pie) चवदार होता.  इतर सर्वांसाठी डुक्कर, कोंबड्या, गाय यांच्या मांसापासून बनवलेले पदार्थ होते. डेसर्ट बुफे जास्त आकर्षक होता : पुडिंग, आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी कॉकटेल ! सर्वांनी जेवणावर ताव मारला.

जेवणाआधी, जेवण करताना आणि जेवण झाल्यानंतरही काही ना काहीतरी पिणे सुरूच होते. येरुन चे कंपनीमधील मित्रमंडळी वेगवेगळ्या देशांची असल्यामुळे पिण्याआधीचे संकेत आणि पिताना चिअर्स म्हणण्याचे नवनवीन प्रकार कळत होते. प्रत्येक भाषेत चिअर्स म्हणताना नवीन ग्लास या बनवलेल्या नियमामुळे पुरेशी बिअर
सर्वांच्या पोटात गेली. येरुन , त्याचे आई बाबा आणि ह्योजिन यांनी सगळ्या पाहुण्यांना भेटून त्यांना रिटर्न गिफ्ट दिले (नक्षीदार चॉपस्टिक्स ) आणि  साडेदहाच्या सुमारास समारंभाची सांगता झाली.

Cheers ! Prost ! Salut!


येरुन आणि ह्योजिन यांचे वैवाहिक जीवन सुखाचे होवो अशी सदिच्छा करत आम्ही  अॅमस्टरडॅमला परतलो.