Wednesday, October 31, 2012

युनिवर्सिटी आणि मी



युनिवर्सिटी मधील वातावरण :

माझ्या युनिवर्सिटीचे नाव "VRIJE "(याचा उच्चार फ्राय असा होतो, ज्याचा तळण्याशी काही संबंध नाही आणि याचा अर्थ फ्री असा होतो, मात्र इथे शिकण्याची फी वार्षिक १२,००० युरो (म्हणजे साधारण साडे-आठ लाख) आहे )!
इंग्रजी मध्ये भाषांतर केल्यास "FREE UNIVERSITY " असे  ऐकून बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज होत असे, म्हणून आता युनिवर्सिटी चे इंग्रजी नाव VU UNIVERSITY असे सांगतात! तर अशी ही VRIJE युनिवर्सिटी अॕमस्टरडॕम
मधील एक नावाजलेली युनिवर्सिटी आहे. जवळ-जवळ १०० हून अधिक देशांचे विद्यार्थी येथे दर-वर्षी शिकत असतात. (वानगी म्हणून माझ्या वर्गात रुमानिया, इटली, ग्रीस, अमेरिका, वगैरे देशांचेचे अनेक विद्यार्थी आहेत)

पहिल्या दिवसापासूनच INTERNATIONAL फील यायला सुरवात झाली. वर्गांत शेजारी बसणारा मुलगा किंवा मुलगी फार तर दुसऱ्या राज्यातून आला असेल, अशी पुण्यातील सवय! आता मात्र शेजारचा विद्यार्थी हा थेट दुसऱ्या खंडातून आलेला असू शकतो, हे जाणवले. इंग्रजी ही एकाच सर्वांना समजेल अशी भाषा..तीही सर्वांना समजेल अशा प्रकारे बोलता येणे इथे आवश्यक आहे. अमेरिकन आणि इंग्लिश मुलांची इथे त्यामुळे गोची होते; त्यांचे फाडफाड इंग्रजी सामान्य डच लोकांच्या डोक्यावरून जाते. "भारतीय इंग्रजी" इथे खूप APPRECIATE करतात, कारण उच्चार शुद्ध आणि पूर्ण असतात!


प्रोफेसर कमाल रे , (पण) अखियो से गोली  मारे....

युनिवर्सिटी मध्ये शिकायला अतिशय उत्तम ENVIRONMENT आहे. सर्वच प्रोफेसर्स स्वतः RESEARCHER असल्याने स्फूर्ती घ्यावी असे आहेत. अनेक वर्ष शिकवत असूनही प्रत्येक लेक्चर व्यावसायिक पणे तरीही विद्यार्थ्यांना रस वाटेल अशा पद्धतीने DELIVER करतात. लेक्चर्स रूम्स भव्य आणि सुसज्ज आहेतच पण त्याहीपेक्षा मोठी आहेत ती प्रोफेसर्स ची मने. त्याचे असे झाले: पहिल्याच दिवशी लेक्चर चालू असताना मला SLIDES मधील काही गोष्टी खटकल्या. माझे मुद्दे नम्रपणे मांडून झाल्यावर प्रोफेसर चक्क "कदाचित माझे चुकले असेल, मी पुन्हा VERIFY करतो" असे म्हणाले. इतर कोणीही प्रश्न विचारले किंवा अगदी वाद जरी घातला तरीही प्रोफेसर्सना तो आवडतो, ते विद्यार्थ्यांना वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतात. दीड तासाच्या लेक्चर मध्ये पाऊण तासानंतर एक ब्रेक असतो , ब्रेक मध्ये प्रोफेसर अनौपचारिक गप्पा सुद्धा मारतात. आम्ही (वर्गमित्र आणि मी ) एकदा शंका विचारायला म्हणून ब्रेक मध्ये गेलो तर उत्तर दिल्यानंतर प्रोफेसर नी चक्क आम्हाला डोळा मारला (!!!). आमची बघण्यात चूक झाली असेल म्हणून आम्ही गप्प बसलो. पण नंतर अनेक दिवस आम्ही निरीक्षण केल्यावर असे लक्षात आले की सर्वच प्रोफेसर्स अधून-मधून डोळे मारत असतात (!). एका डच विद्यार्थ्याने कधीतरी विचारल्यावर खुलासा केला: जेव्हा डच माणूस INFORMAL बोलत असतो, तेव्हा तो अधून-मधून डोळे मारतो. अनेकदा प्रश्नाचे उत्तर सांगितल्यावर समोरच्या माणसाला ते पटले आहे का, हे विचारण्यासाठी सुद्धा डोळा मारण्याची पद्धत आहे.
हे ऐकून आम्ही फक्त "ओके"! म्हणालो.


कधीही युनिवर्सिटी मध्ये गेलो, आणि एखादा उपक्रम चालू नाही असे होते नाही. सतत काही ना काही चालू असते. एखादी डान्सची स्पर्धा , मुखवटे बनवण्याची स्पर्धा किंवा कसले तरी सेमिनार्स, कल्चरल इवेन्ट्स! एकदा उत्साहाच्या भरात विचारायला गेलो होतो: तर समजले अशा स्पर्धांमध्ये त्या त्या कला शाखेची मुले सहभाग घेतात आणि त्यासाठी त्यांनी  अनेक महिने मेहनत घेतलेली असते. यातली एक गोष्ट खूप घेण्यासारखी वाटली: कुठलाही कोर्स हा त्या विषयाचे सखोल ज्ञान देण्यासाठी विचारपूर्वक design केल्याचे जाणवते. जसे की डान्स आवडणारा मुलगा लहानपणापासून डान्स शिकू शकतो आणि त्यातच सर्व प्रकारचे advanced कोर्सेस सुद्धा करू शकतो. प्रत्येक कोर्स design  करताना विद्यार्थ्यांना इतर गोष्टी करण्यासाठी कमीत कमी वेळ मिळाला पाहिजे याची काळजी घेतलेली आहे. याचा फायदा म्हणजे : जे शिकतो आहे ते व्यवस्थित शिकता येते; पण मला होत असलेला मोठा तोटा म्हणजे : अभ्यासाबरोबर फक्त अभ्यास च करावा लागत आहे. इतर गोष्टी करण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो.
एकदा एका व्हायोलीन च्या मैफलीमध्ये १० मिनिटे रमलो , एका तलावाकाठी बदके न्याहाळत काही क्षण घालवले , महिन्यातून दोन वेळा क्रिकेट खेळलो आणि कधीतरी सायकल वर लांबपर्यंत चक्कर मारली. आता ती व्हायोलीन ची संथ सुरावट, सायकल वरून फिरताना दिसलेली नितांत सुंदर हिरवी दृश्ये आणि पाण्यात बेमालूमपणे मिसळून गेलेली हिरवी जमीन मनात घर करू पाहत आहेत...