Sunday, December 30, 2012

रॉटरडॅम सहल : नाताळ विशेष!



२४ डिसेंबर २०१२:

नुकताच ख्रिसमस  ब्रेक सुरु झाला होता. परीक्षेनंतर भटकायला कुठे ना कुठे तरी जायचे असे ठरवले होतेच.
एका दिवसात बघून परत येत येईल अशा "रॉटरडॅम" ला भेट द्यायचे  बहुमताने  नक्की केले. शरण, कौस्तुभा , मी , रोशन व त्याचे स्पेन हून आलेले मित्र : नवनीत, अयाज , जवाद ; असा आमचा सतरंगी ग्रुप जमला.

सकाळी ७ वाजता निघायचे ठरले होते. फोडणीचा भात आणि सॉस असा नाश्ता करून  "अपेक्षेप्रमाणे" आम्ही ९:१५ वाजता Uilenstede (आमचे राहायचे ठिकाण) सोडले. "अॅमस्टरडॅम Zuid (दक्षिण)" या स्थानकाहून ट्रेन ९.४६ ची पकडायची होती. धावत-पळत जाऊन ट्रेन खरोखरच "पकडली". स्कीफोल (Schiphol ) स्थानकाला ट्रेन बदलली. या ट्रेनने  रॉटरडॅम ला पोचायला अकरा वाजणार होते. आता सर्वांनी खिडक्या पकडल्या आणि बाहेरील दृश्ये आपापल्या कॅमेरा मध्ये पकडण्यास सुरवात केली. "ट्रेन मध्ये बिस्किटे किंवा तत्सम खाल्ले नाही तर ट्रीप झाल्यासारखी वाटत नाही" या माझ्या टिप्पणी ला पाकिस्तानी मित्रांकडूनही दाद मिळाली. शरणने आणलेली चॉकलेट-बिस्किटे आणि मी आणलेली मोसंबी संपायला फारसा वेळ लागला नाही. जवाद कडे GPS device असल्याने त्याला "Walking GPS " असे नाव दिले गेले. तो आमचा अनभिषिक्त "गाईड" होता. 

रॉटरडॅम ला उतरल्यानंतर त्याने ही भूमिका चोख बजावली. रॉटरडॅम सेन्ट्रल स्थानकापासून आमची छोटी रेल्वे निघाली. जवाद हे इंजिन.. आणि आम्ही डबे! रॉटरडॅममधील म्युझियम्स असलेल्या रस्त्याने आम्ही पर्यटन सुरु केले. एका दिवसात सर्व म्युझियम्स बाहेरून बघणे सुद्धा अशक्य होते.  Martiem म्युझियम च्या इथे जर वेळ घालवला. 

या Open Air म्युझियम मध्ये अनेक जहाजे ठेवलेली (!) आहेत आणि यातील बहुतेक जहाजे सुस्थितीत असून त्यावर फिरता देखील येते. या म्युझियम च्या जवळच "Walk of  Fame" हा स्पॉट आहे असे GPS ने सांगितले होते ; चौकशी केल्यावर कळले की नूतनीकरणामुळे त्या "फेम"स फरश्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत.
 जहाज-म्युझियम च्या जवळच आकाशाकडे हात केलेल्या हृदय नसलेल्या माणसाचा पुतळा नजरेत भरतो. १९४० साली जर्मनीने केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये संपूर्ण शहर नष्ट झाले होते (अपवाद फक्त St. Lawrence चर्चचा), त्याच्या स्मरणार्थ Ossip Zadkine नावाच्या विख्यात शिल्पकाराने घडवलेले हे शिल्प "The Destroyed City" म्हणून ओळखले जाते.
 
Statue of Erasmus ला जाताना शहराचे सुंदर दर्शन घडले. सुदैवाने पाऊस नव्हता. ख्रिसमस चा मूड शहराच्या गल्ली-गल्ली तून जाणवत होता. जागोजागी ख्रिसमस मार्केट्स आणि रॉटरडॅमला आलेले आमच्यासारखे असंख्य पर्यटक यांनी मुख्य रस्ते फुलून गेले होते. प्रामुख्याने जाणवलेली आणि अॅमस्टरडॅम मध्ये नसलेली गोष्ट म्हणजे अनेक चौकांत उभारलेले लहान-मोठे मनोरे.. मनोरे कसले, एखादी बिल्डींग बांधून झाल्यावर सिमेंट उरले की जवळच्या चौकात त्याची एक उंच भिंत उभारणे हा इथल्या बिल्डर्स चा उद्योग असावा..


St . Lawrence चर्च ! रॉटरडॅममध्ये उभी असलेली एकमेव मध्ययुगीन इमारत! भव्य-दिव्य अशी ही इमारत आम्ही फक्त फोटो काढण्यापुरती पाहिली.  स्थापत्य शास्त्राचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही. 

या चर्चच्या समोर Erasmus यांचा १६२२ साली बांधलेला ब्राँझ चा पुतळा आहे. Erasmus हे रॉटरडॅममध्ये जन्मलेले एक थोर युरोपिअन तत्वज्ञ आणि विद्वान होत. विकिपीडिया वर त्यांची माहिती वाचून इतिहासाच्या पुस्तकाची आठवण होते: "मानवतावादी", "सहिष्णू" , "तत्ववेत्ता" असले शब्द केवळ इतिहासाच्या पुस्तकातच वाचल्याचे आठवतात ! 

नवनीत, अयाज  आणि जवाद हे तिघेही Erasmus  Mundus या program द्वारे स्पेनमध्ये आलेले असल्याने 
कृतज्ञता म्हणून त्यांनी त्या पुतळ्याला सलाम केला.

Cube  Houses आणि पोर्ट ही पुढील प्रमुख आकर्षणे होती. 
Cube Houses हा एक मोठाच विलक्षण प्रकार होता. षटकोनी खांबावर ठेवलेला ४५ अंश कोनात झुकलेला एक घन म्हणजे घर.. अशी ही संकल्पना आहे. शब्दांत मांडण्याचा हा एक प्रयत्न , जो कितपत सफल झालाय हे खालील चित्र पाहून ठरवा..


A picture  says  thousand words ! या "हटके" घरांमध्ये माणसे राहतात. उत्सुक पर्यटकांचा त्रास सर्वांना होऊ नये म्हणून इथल्या एका माणसानी त्याचे घर पर्यटकांसाठी खुले केले आहे आणि तो चक्क त्याच्या घरात येण्यासाठी तिकीट घ्यायला लावतो!!!! अडीच युरो! त्या बिचाऱ्याचे  घर त्या "घन"दाट  जंगलात अगदीच "आत" असल्याने त्याच्या शेजाऱ्यांना पर्यटकांना त्याचा पत्ता सांगण्याचा थोडा त्रास पडतोच. त्या घनात (घरात) आमच्या ट्रिक फोटो-ग्राफीला ऊत आला. 
Cubes च्या जंगलातून बाहेर पडल्यावर सर्वांना भुकेची जाणीव झाली. एका छोट्याश्या हॉटेलात जेवण उरकले. फ्रेंच फ़्राइज हा सर्वांत आवडलेला पदार्थ! (यावरून जेवणाची कल्पना येऊ शकेल)

रॉटरडॅमचे पोर्ट हे पुढील आकर्षण होते. Water Front दिसण्यासाठी बरेच चालावे लागणार होते. अर्थात जवाद ने अंतराची काहीच कल्पना न देता "जवळच आहे" असे सांगून सर्वांना चालवले. प्रत्यक्षात जेव्हा जलाशयाचा किनारा पाहिला तेव्हा त्या चालण्याचे काही वाटेनासे झाले. थेट मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ची आठवण करून देणारे ते ठिकाण अंगावर रोमांच आणणारे होते.

 जलाशयाच्या किनाऱ्यावरून Erasmus bridge पर्यंत walk साठी निघालो. वाटेत International Flag Parade या भागात रॉटरडॅममध्ये ज्या ज्या देशांचे लोक राहतात त्या त्या  सर्व देशांचे झेंडे लावले आहेत. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांचे झेंडे शोधून एकमेकांचे फोटो काढून घेतले :-) 

 Erasmus bridge च्या सुरवातीला दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या नाविक दलातील जवानांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारलेले दिसते. "De Boeg " ("The bow" किंवा नमस्कार) असे याचे नाव. Fred Carasso या शिल्पकाराने घडवलेले ४६मीटर उंचीचे हे शिल्प Erasmus bridge च्या पार्श्वभूमीवर उठून दिसते.

उत्तर आणि दक्षिण रॉटरडॅमला जोडणारा Erasmus bridge देखणा आहेच. शिवाय Tour de France , Red Bull Air Race अशा स्पर्धांमुळे सर्वांत प्रसिद्ध पूल म्हणून प्रसिद्ध  आहे(!) सर्व जण आता घरी परत जाण्याची घाई करत असल्याने मी व कौस्तुभ अक्षरशः पळत-पळत जाऊन पुलावर गेलो. भर्राट वारा, रंगीत ढग आणि संधिप्रकाशात न्हाऊन निघालेला रॉटरडॅमचा जलाशय हे सर्व मनात साठवून परत निघालो.

(फोटो क्रेडिट्स : विकिपीडिया, अयाज, उन्मेष )