Monday, November 19, 2012

"अॅम"ची दिवाळी

नोव्हेंबर २०१२

"यंदा दिवाळी अॅमस्टरडॅम मध्ये साजरी करायची आहे", हा विचार खूप आधीच मनात डोकावून गेला होता, अगदी फ्राय  (VRIJE ) युनिवर्सिटी मध्ये अॅडमिशन मिळाल्यापासून "तिकडे गेल्यावर आपण आपले सण कसे साजरे करू अशा कल्पना मी रंगवू लागलो होतो. गणपती उत्सवानंतर आलेला "दिवाळी" हा पहिलाच मोठा सण ! 

३ नोव्हेंबर लाच अॅमस्टरडॅम मध्ये राहत असणाऱ्या भारतीय लोकांनी दिवाळी उरकली होती. ती अशा प्रकारे: एका मैदानावर मांडव-सदृश आडोसा उभारून आत मध्ये विविध भारतीय खाद्य पदार्थांची दुकाने, एका बाजूला स्टेज ज्यावर दिवाळीशी बादरायण संबंध असणार नाही असे कार्यक्रम (उदाहरणार्थ सालसा डान्स !!) आणि दिवाळीचा फील येण्यासाठी संध्याकाळी फटाके! त्यासाठी इथे म्युनिसिपालिटी ची परवानगी घ्यावी लागते (पैसे भरून)! शोभेचे फटाके उडवण्यास सुद्धा कायद्याने बंदी आहे... त्या ठिकाणी (अम्स्तेल्वीन  सेंटर, जेथे दिवाळी साजरी केली जात होती ),  शनिवार पेठेतील एखादे आठ वर्षांचे पोर भाऊबीजेच्या दिवशी जेवढे  फटाके उडवेल , तेवढेच फटाके (जेमतेम ५ मिनिटे) उडवण्यात आले. ते बघण्यासाठी मी कौस्तुभा बरोबर गेलो होतो; "अगदीच काही नसण्यापेक्षा हेही नसे थोडके"!


वसुबारस: (१० नोव्हेंबर)
इथे गाय (जिवंत) बघायला मिळणे मुश्कील होते, तेथे वासरू शोधून त्याला धने-गूळ  यांचा नैवेद्य देणे हे महा-मुश्कील काम होते. कालनिर्णय बघून दिवस लक्षात होता इतकेच.

धनत्रयोदशी: (११ नोव्हेंबर)
सूर्य खूप दिवसांनी दिसला. दुपारी अॅमस्टेल पार्क येथे फिरावयास गेलो. घरापासून जवळ असलेल्या या पार्क मध्ये प्राणी सुद्धा आहेत, असे समजले होते. त्यांत उल्लेखनीय म्हणजे "पांढरा कांगारू" !


White Kangaroo @ Amstel park, Amstelveen, Netherlands

 रविवार असल्याने बागेत "अपेक्षित" गर्दी होतीच. शरद ऋतुचा प्रभाव वृक्षांवर जाणवत होता. पानांनी फुलांचे  रंग धारण करून झाडांना एक निराळीच आकर्षकता प्राप्त करून दिली होती. 
A beautiful tree in Amstel park, Amstelveen

बागेतून घरी आल्यावर भारतातल्या घरी सर्वांबरोबर video  कॉल  केला. माझी लाडकी भाची ओजस्वी आणि पल्लवी-किरण यांच्याशी सुद्धा video  कॉल  करून बोललो. त्यांच्या घरातील  आकाश-कंदील, दिवे  बघितले.
धन्वन्तरीचा श्लोक आणि शुभ दीपावली चे ई-मेल आप्तेष्टांना पाठवून मनाचे समाधान करून घेतले.


नरक-चतुर्दशी - लक्ष्मीपूजन: (१३ नोव्हेंबर)

दुपारी  कॉलेज  होते; मात्र संध्याकाळी "मानसा" च्या बिल्डींग मध्ये तिच्या मजल्यावर आम्ही दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते. कॉलेज हून घरी आलो तेव्हा घरून आलेले पार्सल (फराळाचे ) माझी वाट  पाहत होते...इतका आनंद पहिला पगार मिळाल्यावर सुद्धा झाला नव्हता! 
त्याप्रमाणे सात वाजता तिच्या रूमवर जमलो. लक्ष्मीची (रुपये आणि युरो दोन्ही) पूजा केली. नाण्यांचे स्वस्तिक बनवले.कौस्तुभा ने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून दिली, त्यामुळे सोन्याची पूजा सुद्धा करता आली. स्वस्तिक व सोन्याला  हळद-कुंकू व फुले वाहून, गणपतीची व महालक्ष्मीची आरती म्हटली. येणाऱ्या सर्वांना कुंकवाचे गंध लावण्यात आले. नरक-चतुर्दशीची गोष्ट (कृष्ण-सत्यभामा व नरकासुर) सांगण्यात आली आणि प्रसाद म्हणून शंकरपाळे देण्यात आले. दिवाळीमध्ये "दिवे का लावतो"  याची आपापल्या परीने उत्तरे दिली.
यानंतर एकत्र स्वयंपाक केला: भात-सांबार, चना-मसाला, पाणी-पुरी (मसाला रेडीमेड), आणि जिलेब्या!
जेवण करण्या-अगोदर डायनिंग टेबल वर छोटेखानी  दीपोत्सव केला.

पणती व स्वस्तिक यांचे आकार साकारले होते. दिवाळीचा खऱ्या  अर्थाने फील आला. यानंतर मानसा च्या कोणा-एका मैत्रिणीने काहीतरी समज करून घेऊन हिंदी (bollywood )गाणी लावली. मग त्यावर ओघाने डान्स! इथे कुठलीही गोष्ट साजरी करताना (celebrate ) करताना, डान्स हा अविभाज्य भाग असतो, हे एक निरीक्षण!
जेवण सर्वांना आवडले आणि तृप्त मनाने आम्ही आपापल्या घरी परतलो. मी घरात लक्ष्मीपूजन केले, महालक्ष्मीची आरती केली आणि "दिवाळी साजरी झाली" या आनंदात  झोपी गेलो.

बलि-प्रतिपदा (पाडवा) : १४ नोव्हेंबर 
औक्षण व्हायला हवे होते, इतकेच या दिवसाचे माझ्या लेखी महत्व होते.
संध्याकाळी आईने video कॉल वर ओवाळले त्यावेळी माझी मैत्रीण टाटीयाना हिच्याकडून ओवाळून घेतले. आईकडून होणाऱ्या औक्षणाचे महत्व सांगितल्यावर  तिच्या डोळ्यात तरारलेले पाणी खूप काही सांगून गेले. 
काहीतरी गोड म्हणून मी आज गाजर हलवा करण्याचा घाट  घातला होता. गाजरे किसताना हात दुखून आले. घरी आई ला "आज गाजर हलवा कर" असे सांगणे खूप सोपे होते. प्रत्येक हिवाळ्यात किती वेळा गाजर हलवा केला हे आईला मोजून  दाखवणारा मी , त्याबद्दल स्वतःची लाज वाटत होती. माझे सर्व चोचले पुरवणारी माझी आई, माझ्या हातचा गाजर हलवा खायला त्या दिवशी तिथे  माझ्या-जवळ हवी होती. असो. कौस्तुभ-मानसा ,रोशन ,शरण व निशांत  यांना गाजर हलवा खिलवला. त्या दिवशी  समजले - न खाता सुद्धा पोट कसे भरते ते...
गाजर हलवा (carrot pudding)