Monday, June 24, 2013

"कोकेन" (केउकेन) हॉफ : नशा फुलांचा

४  मे  २ ० १ ३

केउकेनहॉफ ! (Keukenhof ) इंग्रजी मध्ये याचा अर्थ किचन गार्डन असा होतो. "केउकेनहॉफ" जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग मानली  जाते. ३२ हेक्टरचा विस्तार असणाऱ्या  या  बागेत दरवर्षी ७ लक्ष हून अधिक फुले फुलवली जातात. केउकेनहॉफ विषयी असलेला मोठा गैरसमज  म्हणजे टुलिप गार्डन ! हे टुलिप गार्डन नसून, इथे फुलणाऱ्या अनेक फुलांपैकी एक प्रमुख आकर्षण म्हणून टुलिप प्रसिद्ध आहे . त्यामुळे फक्त टुलिप ची शेतं बघण्याची इच्छा असेल , तर बागेचे तिकीट न काढता , बागे बाहेरील टुलिप च्या शेतांमध्ये मनसोक्त वेळ घालवता येतो .
मात्र  बागेत फुलवलेली फुले आणि विकसित केलेले रमणीय भूप्रदेश ( landscapes ) हे बघण्यासारखे आहेत. हे बाग केवळ मार्च ते मे या कालावधीतच खुली असते. बागेत फुललेले टुलिप पहायचे असल्यास एप्रिल महिन्याच्या शेवटी येथे भेट द्यावी.
अनायासे अॅमस्टरडॅम मध्ये असल्याने एक दिवस या बागेत जाऊन यावे असे बरेच दिवस चालले होते. रोशन चा मित्र अभिनव साडू त्याला भेटायला जर्मनी हून आला आणि त्यांच्या सोबत कौस्तुभा , शरण व मी ही छोटीशी ट्रीप आखली.
स्कीफोल विमानतळावरून "लीसं"  (Lisse ) येथे वसलेल्या केउकेन हॉफला जाण्यासाठी खास बस सोडण्यात येतात. २३ युरो च्या तिकिटात बसचे जाण्या-येण्या साठीचे भाडे आणि बागेचे प्रवेश शुल्क यांचा समावेश असतो (तिकिटाचा दर २०१३ प्रमाणे ). स्कीफोल विमानतळावर केउकेन हॉफ ला जाणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र exit ची सोय होती. बस मध्ये बहुतेक पर्यटक भारतीय किंवा पौर्वात्य देशातील दिसत होते. त्यामुळे उगाच आपल्या माणसांत आल्या सारखे वाटत होते.  कानावर मराठी / हिंदी पडताच कान टवकारले जात होते. भाषा ही एक अजब गोष्ट आहे. ती अवगत नसेल तर तुम्ही कान असूनही बहिरे ठरता आणि तीवर प्रभुत्व असेल तर परक्या देशातही आपले ठरता. असल्याच काहीशा विचारांत बसने केउकेन हॉफ  पर्यंतचा पल्ला पार केला.

बागेचा परिसर  विस्तीर्ण असून तिची रचना विविध पद्धतींनी केली आहेत. २ ० १ ३ ची थीम "UK : Land  of great gardens " होती. लंडन चा Big Ben tower फुलांची रांगोळी फुलवून साकारला होता !

बागेचे विविध भागांत विविध देशांच्या खास शैली प्रमाणे फुलांचे ताटवे विकसित केले होते. इंग्लिश landscapes , जपानी country गार्डन , नेचर गार्डन अशा पद्धती पहावयास मिळतात. वसंत ऋतू इथे खऱ्या अर्थाने सर्व रंग आणि त्यांच्या शक्य तितक्या छटा यांची ओळख करून देतो (रंग दाखवतो असे म्हणणे योग्य होणार नाही )

 नेदरलँडच्या आता पर्यंत च्या सर्व राण्या आणि राजे यांच्या नावाने या बगिच्यामध्ये लहान - मोठ्या प्रदर्शनीय इमारती / तंबू ( Pavilion ) आहेत. प्रत्येक तंबू म्हणजे एक ग्रीन हाऊस आहे. प्रत्येक ग्रीन हाऊस मध्ये नेत्रसुखद अनुभवांची रेलचेल होती.

बागेत एक पवनचक्की पर्यटकांसाठी खुली आहे (मोफत !)  तीवरून बागेबाहेरील टुलिप ची शेते सुंदर टिपता येत होती (डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात सुद्धा )
वर्णन लिहिण्यास आता शब्द अपुरे पडायला लागले आहेत ! काव्यात्मकच काहीतरी लिहिणे क्रमप्राप्त आहे :
इन्द्रधनु जणू बनू पाहती टुलिप ची ही फुले । निळाई आकाशी खुले अन "धरती"पण धरती भुले ॥

हंसराज श्वेत हा पाण्यात ! रंगीत कुसुमांना पाहतो पाण्यात !






किरण सूर्याचा लपू पाहे ! अशी ही ट्युलिप्स ची रांग आहे !


जळी स्थळी सर्वकाळी । पर्णांच्या मखरातील तळी ॥
ज्योती पेटलेल्या असंख्य जणू या धरणी ।  रमलेले मानव रंगात, नाही कुणी हरणी ॥


फुले आवडो न आवडो ! फुलं  आवडणाऱ्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर एकदा तरी भेट द्यावी असे हे उद्यान आहे !


2 comments: