Saturday, March 15, 2014

कुटुंबवत्सल डच !

१५ मार्च २०१४ :
Vrije (फ्राये) unviersity मध्ये शिकताना अनेक डच सहाध्यायी बरोबर होते. त्यापैकी काही जणांशी चांगली मैत्री झाली. नाथन श्खाखेन (Nathan Schagen) हा त्यापैकी एक ! माझ्या हॉस्टेल मध्ये शेजारच्या बिल्डींग मध्ये राहतो , मूळचा अलकमार (Alkmaar) चा ! अलकमार हे अॅमस्टरडॅमच्या आणि पर्यायाने नेदरलँडच्याही  उत्तरेस असलेले, आणि समुद्र किनारी वसलेले एक छोटे शहर. नाथनने त्याच्या आई-वडलांना विचारून माझ्या बरोबर एका दिवसाची भेट आयोजित (आणि नियोजित )केली होती म्हणजे व्यवस्थित कॅलेंडर मध्ये दिवस राखून appointment ठरवली होती:शनिवार ,१५ मार्च.  हॉस्टेल वरून सायकल ने सकाळी नऊ च्या सुमारास निघालो. Amsterdam Zuid या स्थानकाच्या बाहेर सायकली लावून ५० नंबर च्या मेट्रो ने Sloterdijk  (स्लोटरडाइक) स्थानकापर्यंत गेलो. येथून अलकमार साठी Den Helder ( नेदरलँडचे उत्तर टोक) ला जाणारी ट्रेन पकडली. अकरा वाजण्याच्या सुमारास आम्ही अलकमार ला पोचलो सुद्धा !
नमुनेदार डच शहराचा साज अलकमार ने  सुद्धा चढवला आहे: कालवे (कॅनल्स) , बसकी लाल विटांची घरे, आणि निसर्गाची हिरवाई कमी होऊ न देता फुला-पानांमधून वाट काढू पाहणाऱ्या वाटा ! नाथन ची आई कारने आम्हाला घ्यायला आली होती. घरी जाण्यासाठी तिने मुद्दाम दुतर्फा पिवळी फुले असलेल्या रस्त्याने नेले आणि दहा मिनिटांचाच  प्रवास नेत्रसुखद केला. नाथन चे घर हे "खेड्यामधले घर कौलारू" या गाण्याची आठवण करून देणारे होते:
Nathan's home as seen from the back yard !


नाथन च्या आईने तिची ओळख नाथन ची आई अशी न करून देता "आनया" अशी करून दिली. विशेष म्हणजे नाथन स्वतः त्याच्या आईला नावानेच हाक मारतो. पहिला जाणवलेला सांस्कृतिक फरक ! नाथन चे बाबा (केस, हे त्यांचे नाव ) आणि धाकटा भाऊ इझाक हे फुटबॉल खेळायला गेलेले असल्याने आमच्या स्वागतासाठी घरी नव्हते.
Nathan with his mother , at the door of his home !

ते येईपर्यंत आम्ही त्यांच्या मळ्याकडे निघालो. चालत जाताना एका बंदिस्त कुरणात चरणाऱ्या मेंढ्यांनी मे-मे  करून आमच्या कडून गवत भरवून घेतले.

घरापासून दहा मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर असलेला मळा आनया आणि केस यांची बागकामाची हौस पूर्ण करतो.
Rented farm of Family Schagen

 आनयाने संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी म्हणून काही कंद तोडून घेतले:


पवनचक्की, सायकल, कौलारू घरे अशी अस्सल डच पार्श्वभूमी असलेला मळा बघून आम्ही घरी परतलो.

एव्हाना केस आणि इझाक परतले होते. केस - नाथन चे बाबा , हे नेपाळ ला जाऊन आलेले असल्याने भारतीय राहणीमान आणि पद्धती याबद्दल त्यांना जुजबी माहिती होती. उत्सुकतेपोटी विचारलेल्या त्यांच्या अनेक प्रश्नांना मी उत्तरे दिली. भारतीय महिलांचा पेहराव, दागिने , सोने , हत्ती आणि साप हे आमच्या चर्चेचे मुख्य घटक होते. गप्पा करतच आम्ही जेवण उरकले: डच ब्रेड, चीज, जॅम, आणि चहा ! चहा आणि कॉफी सतत कुणी ना कुणीतरी करत होते आणि सर्व जण  पीत होते. त्यांच्या कडे नाथन च्या पणजी पासून चालत आलेली चहाची मोठ्ठी किटली होती. आणि नाथन चे आई-बाबा कौतुकाने त्या किटली च्या आठवणी सांगत होते.
जेवण झाल्यावर आम्ही वातावरण चांगले असल्याने (म्हणजे सूर्याने दर्शन दिल्याने) अगोदर बीचवर जाण्याचे ठरवले .
इझाकला शाळेतील एक प्रोजेक्ट चे काम असल्याने तो घरीच थांबला. अकरावीत शिकणारा इझाक अतिशय चुणचुणीत मुलगा वाटला.
नाथन, केस, आनया आणि मी असे चौघे त्यांच्या गाडीमधून Bergen beach ला निघालो. अलकमार चा हा भाग थोडा उंच-सखल असल्याने येथे छोट्या टेकड्या आहेत असे वाटते. प्रत्यक्षात मात्र हा भाग समुद्राचे पाणी गावात येऊ नये म्हणून (मानवनिर्मित) वाळूच्या टेकड्यांनी (Dunes) तसा बनवला आहे. समुद्र अपेक्षेप्रमाणे सुंदर होता आणि किनारा अपेक्षेपेक्षाही स्वच्छ ! लहान डच मुले पाणी अडवण्यासाठी Dijk (डच शब्द डाइक म्हणजे पाट/बांध ) बनवत होती.

Children busy building Dijk @ Alkmaar beach

बीचवर लांबपर्यंत चालत आम्ही खारे वारे अनुभवले आणि बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. नाथन चे आई-वडील दोघेही पेशाने शिक्षक असून दोघेही डच Vrijeschool मध्ये शिक्षक आहेत. Vrijeschool (शब्दशः फ्री स्कूल) म्हणजे पारंपारिक अभ्यासक्रम न शिकवता कला आणि उद्योग यांना उत्तेजन देणारे अभ्यासक्रम (जसे की बागकाम , सुतारकाम, विणकाम वगैरे) शिकवणारी शाळा. नाथन ची आई येथे बागकाम शिकवते. नाथन , त्याचे दोनही भाऊ याच शाळेत सुरवातीची काही वर्षं शिकले. केस आणि आनया यांनी प्राथमिक शिक्षकांची तेथील अवस्था विशद केली.  ती तंतोतंत भारतातील परिस्थितीशी मिळती-जुळती आहे :
काही वर्षांपूर्वी जो मान आणि जे सामाजिक स्थान प्राथमिक शिक्षकांना मिळत असे ते आज मिळत नाही. इतकेच नव्हे तर पगारही तुलनेने अत्यंत कमी मिळतो. त्यांनी घर घेण्यासाठी कसे आणि किती कष्ट घेतले , मुलांना व्यवस्थित वाढवता यावे यासाठी कसे निर्णय घेतले , अशा सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्याशी कोणताही आड-पडदा न ठेवता शेअर केल्या. मोकळेपणा आणि स्पष्टवक्तेपणा यात डच लोकांचा हात कुणी धरू शकेल असे मला तरी वाटत नाही. त्यांच्या अशाच दिलखुलासपणामुळे मीसुद्धा त्यांच्या शंकांना मोकळेपणाने उत्तरे देऊ शकलो.
@ Alkmaar beach with Nathan and Cees

नाथन च्या आई आमचे बरेच फोटो काढले आणि उन्हाळ्यातील तिथल्या रसरशीत मूड ची वर्णने करून त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 बीच वरून घरी परत येताना पाळीव प्राण्यांच्या एका छोट्या पार्क पाशी थांबलो. शेळ्या, मेंढ्या, हरणे, वगैरे प्राणी आणि एमूची एक जोडी ,सर्व  जण एकत्र एका ठिकाणी चरत होते. काही उत्साही (आणि खट्याळ ) डच मुले त्यांना खायला देण्याच्या बहाण्याने फक्त हात लावून पळून जात होती.

 घरी परतल्यावर पुन्हा  चहा-नाश्ता झाला.  फार वेळ न दवडता आम्ही अलकमार मधील स्विमिंग पूल कडे निघालो. या वेळी इझाक सुद्धा आमच्या बरोबर होता. अॅमस्टरडॅममधील Mirandabad पेक्षा हा पूल मोठ्ठा असल्याने नाथनला हा पूल मला दाखवायचा होता. 
५० मीटर लांबीचे दोन आणि २५ मीटर लांबीचा एक , याशिवाय पाण्यात खेळण्यासाठी विविध Pool -toys आणि Water-Slide असल्याने जणू ते एक water-park असल्यासारखे होते.  डच ओपन कल्चर चा अजून एक धडा आणि एक सांस्कृतिक फरक इथे स्पष्ट झाला. कपडे बदलण्यासाठी इथे प्रत्येकाला स्वतंत्र खोली / जागा नव्हती. एका मोठ्ठ्या हॉल मध्ये पुरुष आणि दुसऱ्या हॉल मध्ये स्त्रिया इतकाच फरक. याशिवाय हॉल मध्ये कुणीही टॉवेल ने अंग झाकून कपडे बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत नव्हते. स्वतःला नैसर्गिक अवस्थेत कुणा समोरही सादर करण्याचे तिथे कुणाला वावडे वाटत नव्हते. तेथील एक स्विमिंग पूल नैसर्गिक अवस्थेत पोहण्यासाठी उन्हाळ्यात खुला असतो !
आम्ही water-slides  आणि water -polo खेळून फारसे न पोहताच दमलो. उशीर झाल्याने आम्हाला sauna - टब-बाथ चा आनंद लुटता आला नाही. पूल ची वेळ संपेपर्यंत (म्हणजे पाच वाजेपर्यंत ) आम्ही पोहत राहिलो. स्विमिंग पूल वरून आम्हाला घ्यायला नाथन ची आई आली होती . तिने घरी अगोदरच डिनर ची तयारी करून ठेवली होती. अप्रतिम असा Vegetable-Pie तिने बनवला होता :
Vegetable Pie prepared by Anja
 तसेच स्टार्टर म्हणून सूप आणि पापडा प्रमाणे भाजेलेले गार्लिक बिस्कीट हेसुद्धा लाजवाब होते. जेवायला सुरवात करण्यापूर्वी आम्ही डच परंपरेप्रमाणे एकमेकांचे हात धरून डच "वदनी कवळ घेता " म्हटले.  माझ्या लक्षात राहावे म्हणून ते इथे लिहीत आहे :
"Onze Vader die in de hemel zijt,
uw naam worde geheiligd.
Uw koninkrijk kome, uw wil geschiede,
gelijk in de hemel als ook op deze aarde.
Geef ons heden ons dagelijks brood
en vergeef ons onze schulden
gelijk ook wij vergeven onze schuldenaren.
Leid ons niet in verzoeking,
maar verlos ons van de boze.
Want van U is het koninkrijk en de kracht
en de heerlijkheid, tot in eeuwigheid.
Amen"

 याचा अर्थ आपल्याकडच्या पुढील श्लोकांप्रमाणे आहे : "मोरया मोरया मी बाळ तान्हे , तुझीच सेवा करू काय जाणे" आणि वदनी कवळ घेता"!

गप्पा आणि विनोदांच्या  चवीसमोर Vegetable Pie हा फक्त पोटाला शांत करण्याचे काम करत होता, असे म्हटले तरी चालेल.
Dessert म्हणून नंतर  Pears (पेअर्स) आणि आईस्क्रीम होते.
जेवणानंतरही चहा,कॉफी हे सुरूच होतं आणि गप्पाही !

बोलता बोलता नाथन चा मोठा भाऊ रोलांड, याचाही विषय निघाला. तो Delft university मध्ये शिकत असून. गेले अनेक महिने घरी आलेला नाहीये. माझ्या समोरच नाथन च्या आई-बाबांनी रोलांड ला भेटण्या साठी त्याची appointment घेतली पाहिजे अशी चर्चा केली !! ते किती पुरोगामी विचारांचे आहेत हे मला पुढील माहितीवरून कळले : रोलांड जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंड सोबत घरी राहत असे , तेव्हा त्याला घरातील सर्वात मोठी बेडरूम दिली होती. नाथन चे आई -वडील स्वतः दुसऱ्या लहान खोलीत राहत असत. मुलांना त्यांची स्पेस देऊन स्वतंत्र पणे जगायला प्रवृत्त करणारे ते सजग डच पालक होते, हे जाणवले.

श्खाखेन घराण्याचा बहुतेक सर्व इतिहास मला सांगून झाला:
नाथन च्या आज्जीला एकूण १४ मुले होती. नाथन चे वडील त्यापैकी एक ! त्यामुळे घरी फुटबॉल ची टीम असे.
नाथन च्या आज्जीच्या वाढदिवशी त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक स्नेहसंमेलन असते. तेव्हा आवर्जून सर्व कुटुंब एकत्र जमते. नाथन ची आज्जी अजूनही त्याच शहरात एका मोठ्ठ्या घरात राहते.  नाथन च्या वडलांचा सर्व भावंडांबरोबर चा फोटो, इतर सहलींचे, वाढदिवसांचे फोटो अल्बम्स मला कौतुकाने दाखवले. त्यांच्या घरात सर्वच जण बऱ्यापैकी (चांगली) चित्रे काढत असल्याने सर्वांच्या चित्रांचे संग्रह घरात ठिकठिकाणी आहेत. भिंतींवर टांगलेली चित्रे मुलांनी नाहीतर आनया किंवा केस यांनी काढलेली आहेत. चित्रांशी निगडीत असलेल्या आठवणी आणि गमतीजमती सांगताना संपूर्ण कुटुंब समरसून जात होते. नाथन ने गप्पांमधून विराम म्हणून काही वेळ गिटार वाजवली.

नाथनच्या आईला , त्यांच्या मोठ्ठ्या कुटुंबाचा आणि त्यामध्ये कौटुंबिक कलह नसल्याचा अभिमान होता आणि ती करत असलेल्या शिक्षिकेच्या कामावर ती खूश होती. तिने मला निघताना घरी सात फळांपासून बनवलेल्या जॅमची एक बाटली भेट म्हणून दिली.  नाथनच्या बाबांबद्दलही हेच सांगता येईल.  शिक्षकाला शोभेल अशी संयमी संभाषण शैली, पटकन कुणालाही आपलेसे करण्याची वृत्ती मला त्यांच्यात दिसली. मला निघताना खांद्यावर हात ठेवून "काही लागलं तर सांग" , असं म्हणाले तेव्हा एका दिवसाच्या आपुलकीचा तो परिपाक होता असेच म्हणावे लागेल.
अलकमार येथून निघणाऱ्या शेवटच्या ट्रेनने आम्ही अॅमस्टरडॅमला परतलो. एका डच कुटुंबाकडून प्रेमळ आदरातिथ्य झाल्यामुळे माझा दिवस छान गेला होता. आरशाप्रमाणे स्पष्ट आणि स्वच्छ जीवन जगणारे नाथनचे कुटुंब वर्षानुवर्षे तसेच जगत राहो इतकीच त्या प्रेमळ कुटुंबासाठी प्रार्थना !


2 comments:

  1. are faar ch bharri...aplyakade barech lok asa chitra nirman kartat ki west madhe kutumb paddhati ch nahi etc etc..this should be an eye opener for them..keep writing.. :)

    ReplyDelete
  2. Good writing, my mind was actually wandering der while reading.... still it's in backyard :)

    ReplyDelete